मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या तातडीच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या 'डायल ११२' या हेल्पलाईनचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करणे एका मद्यपी तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मध्यरात्री दारूच्या नशेत चाकूने भांडण सुरू असल्याचा बनावट कॉल करून पोलीस यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या माळीपेठ येथील तरुणाविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री केला खोटा कॉल
दिनांक ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:४७ वाजता माळीपेठ, मेहकर येथील रहिवासी गणेश तुकाराम राऊत (वय ३१) याने 'डायल ११२' वर संपर्क साधला. डोणगाव रोडवरील 'मँगो हॉटेल'जवळ काही लोक चाकू घेऊन जोरदार भांडण करत असून तातडीने पोलीस मदतीची गरज असल्याचे त्याने सांगितले.
पोलीस पथक तातडीने घटनास्थळी, पण...
कॉलचे गांभीर्य ओळखून नाईट ड्युटी अधिकारी सपोनि अशोक गाढवे, पोलीस अंमलदार सुनील देशमुख आणि चालक पोलीस अंमलदार शिवाजी चिम यांनी तातडीने शासकीय वाहनाने घटनास्थळ गाठले. तेथे पोहोचून कॉल करणाऱ्या गणेश राऊत याला विचारपूस केली असता, परिसरात कोणतेही भांडण झाले नसल्याचे समोर आले. तसेच संबंधित तरुण दारूच्या प्रचंड नशेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल
केवळ नशेत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा बनाव रचल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी गणेश राऊत याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. शासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात अप. क्र. ५७५/२६, बीएनएस (BNS) कलम २१७ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
'डायल ११२' ही सेवा चोरी, प्राणघातक हल्ले, महिलांची सुरक्षा, आग किंवा इतर गंभीर आपत्कालीन प्रसंगी तातडीने मदत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. अशा हेल्पलाईनवर विनाकारण, खोडसाळपणे किंवा खोटे कॉल्स केल्यास प्रत्यक्ष गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास विलंबाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या सुविधेचा केवळ वास्तव आपत्कालीन परिस्थितीतच वापर करावा, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मेहकर पोलिसांनी दिला आहे.

0 Comments