हातावर राखी सजण्यापूर्वीच लाडक्या बहिणीने सोडले प्राण;भीषण धडकेत दोघांचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून वाहन जाळून खाक


जळगाव जामोद(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या आनंदात माहेरी निघालेल्या बहिणीवर आणि तिच्या चिमुरडीवर काळाने झडप घातली. टुनकी-लाडनापूर रस्त्यावर ओम डेअरीजवळ शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक वर्षाच्या बालिकेसह तिच्या मातेचा दुर्दैवी अंत झाला, तर भाऊ आणि भाचा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी अपघातग्रस्त बोलेरो गाडी जाळून खाक केली.


नेमकी घटना काय?
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बोरवा येथील रहिवासी कमलेश भुरेलाल चंगळ (वय ३२) हे रक्षाबंधनानिमित्त मध्य प्रदेशातील जसवंती येथून आपली बहीण सपना संजय वासकेला आणि तिच्या दोन मुलांना दुचाकीने माहेरी घेऊन येत होते. टुनकी-लाडनापूर मार्गावरील ओम डेअरीजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून असताना, जामोदच्या दिशेने येणाऱ्या भरधाव बोलेरोने (क्रमांक: MP 12 ZF 9342) त्यांना जोरदार धडक दिली.
माय-लेकीचा करुण अंत, दोघे गंभीर
धडक इतकी भीषण होती की, एक वर्षीय चिमुरडी उमी संजय वासकेला हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई सपना वासकेला यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात दुचाकीचालक कमलेश चंगळ आणि त्यांचा भाचा गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परिसरात संताप आणि शोककळा
अपघाताचे भीषण दृश्य पाहून घटनास्थळावरील नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त बोलेरो गाडी पेटवून दिली, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हातावर राखी बांधण्यापूर्वीच लाडकी बहीण आणि भाचीचा डोळ्यांसमोर मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments