समृद्धी महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांना लुटणाऱ्या कुख्यात टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. अत्यंत धाडसी आणि फिल्मी स्टाईल 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवत पोलिसांनी धाराशिवमधून ७ सराईत दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून महागड्या आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.
लोखंडी वस्तू टाकून केली होती १८ लाखांची लूट
सिन्नरजवळील मलढोण आणि दुशिंगपूर दरम्यान महामार्गावर लोखंडी खिळे व वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका वकील कुटुंबासह एकूण ४ वाहनांमधील प्रवाशांना मारहाण करून सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. ताशी १०० किमीहून अधिक वेगाने वाहने धावणाऱ्या महामार्गावर घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
तपासाची चक्रे आणि 'कॉम्बिंग ऑपरेशन'
घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली १० जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, महामार्गालगतची हॉटेल्स आणि मेडिकल स्टोअर्सची तपासणी करत धागेदोरे शोधून काढले.
पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याचे समजताच आरोपी धाराशिव जिल्ह्यातील गावांमध्ये लपून बसले होते. पोलिसांनी तेरखेडा, पाणगाव, खामकरवाडी आणि उमरा या गावांमध्ये मध्यरात्री धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबवले.
५ किमी दूर लपवल्या होत्या महागड्या गाड्या
दरोडेखोरांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी गावापासून तब्बल ५ किलोमीटर लांब झाडीझुडपात आपल्या महागड्या एसयूव्ही (SUV) लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी या कारवाईत ह्युंदाई क्रेटा, महिंद्रा एक्सयूव्ही ७०० आणि किया सेल्टॉस या गाड्या जप्त केल्या आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी
अर्जुन पवार
अशोक शिंदे
लखन काळे
धनाजी पवार
नितीन शिंदे
गोविंद पवार
या गुन्ह्यात एकूण १२ आरोपींचा समावेश असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पकडण्यात आलेली ही टोळी सराईत असून त्यांनी यापूर्वी बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतही महामार्गांवर दरोडे टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. अवघ्या दोन दिवसांत या गुन्ह्याची उकल केल्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments