दोन महामार्गांचे गाव, पण सुविधांचे मरण; सुलतानपूर बसथांबा बनला दुर्गंधी,अतिक्रमण आणि गैरसोयींचा अड्डा!

स्वच्छतागृहाचा रस्ताच गिळंकृत! सुलतानपूरमध्ये विद्यार्थिनींची कुचंबणा; प्रशासन कारवाई कधी करणार?
सुलतानपूर (विशेष प्रतिनिधी):
दोन महत्त्वाच्या राज्य महामार्गांना जोडणारे आणि शिक्षणाचे मोठे केंद्र म्हणून नावारूपास आलेले सुलतानपूर गाव सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे चर्चेत आले आहे. दररोज हजारो प्रवासी, नोकरदार आणि शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थिनींची वर्दळ असणारा सुलतानपूर बसथांबा सध्या प्रवाशांसाठी सोयीचा कमी आणि त्रासाचाच जास्त ठरत आहे. बसथांब्यावरील सार्वजनिक स्वच्छतागृहाभोवती अनधिकृत अतिक्रमणांचे जाळे पसरले असून, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न थेट ऐरणीवर आला आहे.


सुलतानपूर परिसरात नामांकित हॉस्पिटल्ससह शाळा, महाविद्यालये, पॉलिटेक्निक, फार्मसी आणि नर्सिंग अशा उच्च शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थिनी आणि महिला प्रवासी येथे बसची वाट पाहत थांबतात. मात्र, स्वच्छतागृहाकडे जाणारा मार्गच अतिक्रमणाने गिळंकृत केल्याने महिला प्रवाशांची प्रचंड कुचंबणा होत आहे. परिसरात कचऱ्याचे साम्राज्य, असह्य दुर्गंधी आणि संध्याकाळी पसरणारा अंधार यामुळे समाजकंटकांचे फावले असून महिलांमध्ये असुरक्षिततेचे सावट पसरले आहे.

"बसची वाट पाहताना स्वच्छतागृहाची गरज भासते, पण तिथे जाणेच असुरक्षित वाटते. महिलांना सुरक्षित वाटेल अशी प्रकाशयुक्त व स्वच्छ व्यवस्था प्रशासनाने त्वरित करावी."
— एक त्रस्त महिला प्रवासी

कष्टकरी संघाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना २४ ऑगस्ट रोजी लेखी निवेदन दिले. स्वच्छतागृहाभोवतीचे अतिक्रमण तात्काळ हटवून नियमित स्वच्छता व पुरेशा प्रकाशव्यवस्थेची मागणी करण्यात आली आहे. मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास कष्टकरी संघाच्या वतीने प्रवासी व ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर रमेश रिंढे, भाऊराव भालेराव, सागर पनाड, राजेश पिंपरकर, दत्तात्रय रिंढे, दामोधर कुडके, शिवशंकर निलक, गणेश रत्नपारखी, रामा जुमडे, प्रकाश साखरे, गजानन मापारी आदींच्या स्वाक्षऱ्या असून, याच्या प्रती गटविकास अधिकारी (लोणार), तहसीलदार (लोणार) आणि पोलीस ठाणे (मेहकर) यांना पाठवण्यात आल्या आहेत.

आता या ज्वलंत समस्येवर स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासन केवळ आश्वासनांची मलमपट्टी करते की ठोस कारवाई करून अतिक्रमण हटवते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments