देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगाव मही शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा मारून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १३ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, रोख रकमेसह एकूण २७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव मही शिवारात पैशांची हार-जीत लावून ‘एक्का बादशहा’ नावाचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता घटनास्थळी अचानक छापा टाकला. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन जुगार खेळणारे संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी:
पोलिसांनी संशयितांची अंगझडती घेतली असता सतिष खिल्लारे, ज्ञानेश्वर वाघ, रवि विंगसे, योगेश गुडधे, डिगंबर भागीले, परमेश्वर भागीले, किसन सूर्यवंशी, एकनाथ काकडे, संतोष भागीले, तुषार खिल्लारे, परमेश्वर पंढरीनाथ भागीले, गणेश भागीले आणि नितीन खिल्लारे यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराच्या डावावरील रोख, ५२ ताशांची पाने आणि चटई असा एकूण २७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्यासह जप्त केला.
गुन्हा दाखल:
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड, सपोफौ प्रमोद मुळे, पोहेकॉ माधव कुटे, बद्रीनाथ डिंगोळे, समाधान गीते, शरद साळवे, विजय दराडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल चिंचोले, दसरे आणि गजानन ठाकरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

0 Comments