पत्रकारांचा नाद खुळा! गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला उपविभागीय अधिकाऱ्यांचा दणका.


मलकापूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
कर्तव्य बजावताना पत्रकार आणि सामान्य नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी (SDPO) चांगलीच चपराक लगावली आहे. मलकापूर पत्रकार संघटनेच्या निवेदनाची तात्काळ आणि गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याला कार्यालयात पाचारण करून कडक शब्दांत समज देत 'सक्त ताकीद' (Strict Warning) जारी करण्यात आली आहे.


काय आहे नेमके प्रकरण?

मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार (ब.नं. १५०१) चंद्रकांत शिंदे यांच्या गैरवर्तणुकीबाबत मलकापूर पत्रकार संघटनेचे प्रतिनिधी व 'तरुण भारत/विदर्भ लाईफ'चे वृत्त संकलक दीपक इटणारे यांच्यासह पत्रकारांनी १५ ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासनाकडे तक्रार व निवेदन दिले होते.
या निवेदनाची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन मादरे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला १८ ऑगस्ट रोजी समक्ष कार्यालयात बोलावून त्याची बाजू ऐकून घेतली. पोलीस दलाची प्रतिमा मलीन होऊ नये आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.

पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश:

सौजन्यपूर्ण वागणूक ठेवा: शासकीय कर्तव्य बजावताना जनता, पत्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींशी नेहमी आदराने व सौजन्याने वागावे.
उद्धटपणा खपवून घेणार नाही: कर्तव्यावर असताना कुठल्याही प्रकारची अरेरावी किंवा उद्धट भाषेचा वापर करू नये.
संयमाचे पालन करा: शांतता व संयम राखूनच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले.
कामकाजावर विशेष नजर: संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनात सुधारणा व्हावी, यासाठी त्याच्या दैनंदिन कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पत्रकार संघटनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे पत्रकार वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments