दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंढरपूर येथून शेगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे ११ ऑगस्ट २०२६ रोजी सिंदखेडराजा मार्गे बुलढाणा जिल्ह्यात आगमन होत आहे. ही पालखी १४ ऑगस्ट २०२६ रोजी लोणार येथून सुलतानपूर मार्गे मेहकर येथे मुक्कामासाठी पोहोचणार आहे.
पालखीच्या दर्शनासाठी मेहकर शहरासह परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या काळात गर्दी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्थेचे जतन आणि जनतेच्या सुरक्षेसाठी बुलढाण्याच्या मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०६:०० वाजेपासून ते १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत मेहकर शहरातील वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आले आहेत.
पर्यायी वाहतूक व्यवस्था पुढीलप्रमाणे:
सिंदखेडराजा कडून मेहकरकडे येणारी वाहतूक:
पर्यायी मार्ग: सिंदखेडराजा - देऊळगावराजा - चिखली - अमडापूर मार्ग.
सुलतानपूर मार्गे मेहकर / चिखली लव्हाळा मार्गे मेहकरकडे येणारी वाहतूक:
पर्यायी मार्ग: चिखली - लव्हाळा - अमडापूर मार्ग.
वाशीम, मालेगाव, डोणगाव, मेहकर मार्गे सुलतानपूरकडे जाणारी वाहतूक:
पर्यायी मार्ग: खंडाळा बायपास - सोनाटी बायपास- लोणार फाटा मार्गे चिखली.
जानेफळ कडून मेहकरकडे येणारी वाहतूक:
पर्यायी मार्ग: जानेफळ रोड - डोणगाव रोड - डीपी रोड मार्गे बस स्टँड मेहकर.
नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
पोलीस स्टेशन मेहकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वाहनधारकांनी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पर्यायी मार्गांचाच वापर करावा. मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

0 Comments