बुलढाण्यात खळबळ! "राजीनामा दे नाहीतर संपवेन..." करमोड्याच्या सरपंचाचा शेवटचा व्हीडिओ अन् शेतात आढळला मृतदेह!


संग्रामपूर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. करमोडा गावाचे लोकनियुक्त सरपंच दीपक प्रकाश उगले यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, उगले यांनी रात्रीच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.


मृत्यूआधी व्हॉट्सॲप स्टेटसवरून गंभीर आरोप

या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सरपंचांच्या मृत्यूनंतर त्यांनी मृत्यूआधी व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवलेला एक व्हीडिओ वेगाने पसरत आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी राजकीय विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.

"राजीनामा दे, नाहीतर संपवून टाकीन" अशी उघड धमकी आपल्याला दिल्याचा दावा उगले यांनी या व्हीडिओत केला आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आपला अंत्यविधी शांततेत पार पडावा, असे भावूक आवाहनही त्यांनी व्हीडिओच्या माध्यमातून केले आहे.

केंद्रीय मंत्री अन् आमदारांकडे न्यायाची मागणी

सरपंच दीपक उगले यांनी आपल्या शेवटच्या व्हीडिओत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नावाचा उल्लेख करत या प्रकरणात पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (तथापि, व्हीडिओमधील आरोपांना अद्याप स्वतंत्र किंवा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.)

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवट बकाल येथे पाठवण्यात आला आहे.
सरपंचपदाचा दबाव, राजकीय वैमनस्य की अन्य काही कारण? या दिशेने निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे का, याबाबत पोलिसांची अधिकृत माहिती येणे बाकी असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments