मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्रातील वाहतूक यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण-शहरी भागांतील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी स्थानिक आमदार मनोज कायंदे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेतली. या बैठकीत मतदारसंघातील प्रलंबित रस्ते व पुलांच्या कामांवर सविस्तर मंथन करण्यात आले.
जालना–पुलगाव महामार्गाच्या कामाला गती देण्याचा आग्रह
या भेटीदरम्यान आमदार मनोज कायंदे यांनी जालना–पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या ४ पदरीकरणाचे (4-Laning) काम विनाविलंब आणि वेगाने पूर्ण करण्याची आग्रही भूमिका मांडली. हा महामार्ग या परिसराच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचे काम पूर्ण झाल्यास रोजची वाहतूक कोंडी फुटेल आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विविध रस्ते व पुलांच्या कामांसाठी मागणी पत्र
यासोबतच, सिंदखेड राजा मतदारसंघातील विविध गावांमधील मुख्य रस्ते, जोड रस्ते तसेच धोकादायक पुलांच्या पुनर्रचनेसाठी केंद्रीय निधीतून प्रशासकीय मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा दर्जा जागतिक दर्जाचा करण्यासाठी केंद्रीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आमदार कायंदे यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद
आमदार मनोज कायंदे यांनी मांडलेल्या मागण्यांचा विचार करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सिंदखेड राजा मतदारसंघातील सर्व प्रस्तावित विकासकामांसाठी भरीव निधी देण्याची ग्वाही दिली. तसेच यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
"मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघातील नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सुविधा मिळवून देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. दिल्लीतील या सकारात्मक बैठकीमुळे मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामांचा मार्ग सुकर झाला आहे."
— आमदार मनोज कायंदे

0 Comments