लोणार शहरातील एमटीडीसी (MTDC) समोरील उतारावर पडलेल्या मोठ्या व जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या उदासीन कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला असून, "नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तात्काळ थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडू," असा स्पष्ट इशारा प्रशासनाला दिला आहे.
एमटीडीसी कॉम्प्युटर कॉम्प्लेक्ससमोरील उतारावर तसेच सरदार वल्लभभाई पटेल शाळा आणि मारोती पारा परिसरात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली असून, दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोणार शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध नोंदवत, खड्ड्यांची तातडीने सिमेंट काँक्रिट अथवा उच्च दर्जाच्या डांबरीकरणाद्वारे कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची ठाम मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
प्रशासनाला अंतिम इशारा
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अंबादास पाटील खंड व शहराध्यक्ष तौफिक कुरेशी म्हणाले, "अनेक दिवसांपासून हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. कोणत्याही क्षणी एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना केली नाही, तर होणाऱ्या सर्व अपरिहार्य परिस्थितीस संबंधित प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील."
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यावेळी ज्येष्ठ नेते भगवानराव सानप, कार्याध्यक्ष विठ्ठलजी आटोळे पाटील, शहराध्यक्ष मो. तौफीक कुरेशी, इब्राहिम सर, वितेश चव्हाण, मेराज पठाण, विनोद आघाव, संजय अंभोरे, प्रवीण देशमुख, ज्ञानेश्वर शेवाळे, अभिजीत सानप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"नागरिकांचा जीव सर्वांत मौल्यवान आहे. प्रशासनाने तात्काळ जागे होऊन हा जीवघेणा खड्डा कायमस्वरूपी बुजवावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल."
— मो. तौफिक कुरेशी (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, लोणार)

0 Comments