तरुणांच्या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर प्रशासन झुकले; मैदान न मिळाल्यास 'आमरण उपोषणाचा' विदर्भ कन्या शाहीन ताई पटेल यांचा इशारा
सुलतानपूर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
गावातील खेळाडू, विद्यार्थी आणि पोलीस-लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांच्या हक्काच्या क्रीडांगणाचा (स्पोर्ट्स ग्राउंड) प्रलंबित प्रश्न अखेर आज ऐरणीवर आला. डिसेंबर २०२५ मध्ये दिलेल्या निवेदनावर तब्बल ६ महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने, आज सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सुलतानपूरमधील शेकडो तरुणांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. तरुणांच्या या अभूतपूर्व एकजुटीपुढे आणि आक्रमक पवित्र्यापुढे झुकत अखेर ग्रामपंचायत प्रशासनाला १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत मैदान उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागले आहे.
ठीक ११ वाजता ग्रामपंचायतीला वेढा; स्मरणपत्र देऊन मागितला जाब!
आज सकाळी ठीक ११:०० वाजता गावातील प्रतिष्ठित नागरिक, आझाद क्रिकेट क्लब, जय भवानी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी आणि भरती प्रक्रियेची तयारी करणारे जवळपास १०० ते १५० तरुण ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर जमा झाले. यावेळी ग्रामविकास अधिकारी नंदकिशोर तेजनकर साहेब कार्यालयात आले असता, तरुणांनी त्यांना डिसेंबर २०२५ मधील मूळ अर्जावर आजपर्यंत काय ॲक्शन घेतली? असा थेट आणि जळजळीत सवाल केला. तसेच आजच्या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात आणून देत प्रशासनाला 'स्मरणपत्र' सुपूर्द करण्यात आले. केवळ तोंडी आश्वासनांवर न थांबता "मैदान केव्हा देणार?" याचे लेखी पत्रच तरुणांनी लावून धरले.
अखेर प्रशासनाने दिले लेखी पत्र
तरुणांचा वाढता दबाव पाहून ग्रामविकास अधिकारी तेजनकर साहेब आणि उपसरपंच संघपाल पनाड यांनी तातडीने हालचाल करत अधिकृत लेटरहेडवर लेखी पत्र टाईप करून दिले. या पत्रात, "सुलतानपूर येथील विद्यार्थ्यांना स्वतंत्र क्रीडांगण (मैदान) व व्यायाम सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरात लवकर (१४ ऑगस्ट २०२६) पर्यंत सदर प्रश्न मार्गी लावण्यात येईल," असे स्पष्ट नमूद करून त्यावर स्वाक्षरी व शिक्का देण्यात आला.
नेत्यांची आक्रमक भाषणे आणि आश्वासने
या आंदोलनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना उपसरपंच संगपाल पनाड यांनी सांगितले की, "गावातील मुलांसाठी मैदान उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. मी स्वतः या प्रश्नावर वैयक्तिकरित्या (पर्सनली) लक्ष देऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावेन," अशी ग्वाही त्यांनी दिली.
तर दुसरीकडे, आपल्या आक्रमक शैलीत बोलताना विदर्भ कन्या शाहीन ताई पटेल यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की, "गावातील तरुणांच्या आरोग्याशी आणि भविष्याशी खेळू नका. जर दिलेल्या मुदतीत गावातील मुलांना हक्काचे मैदान मिळाले नाही, तर आम्हास थेट 'आमरण उपोषणाचा' मार्ग पत्करावा लागेल," या इशाऱ्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
यांची लाभली उपस्थिती
तरुणांच्या या आंदोलनाला गावातील राजकीय आणि सामाजिक स्तरावरून मोठा पाठिंबा मिळाला. यावेळी उपसरपंच संगपाल पनाड, विदर्भ कन्या शाहीन ताई पटेल यांच्यासह भगवान चेके, शेख खाजा, सदानंद पाटील, सागर पनाड, सूरज साठे, बंडू जोगदंड, रमेश टकले, सद्दाम भाई, असीम खान, अमीर भाई, प्रताप भानापुरे, शुभम दानवे, आनंद भानापुरे, वैभव आनंदराव,शेख सुलतान, शेर खान, शाहरुख खान आणि आझाद व जय भवानी क्रिकेट व क्लबचे सर्व खेळाडू तसेच भरती सराव करणारे सर्व विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आता ग्रामपंचायतीने १५ ऑगस्टची डेडलाईन लेखी दिली असल्यामुळे, दिलेल्या मुदतीत सुलतानपूरच्या तरुणांना मैदान मिळते की पुन्हा केवळ कागदी घोडे नाचवले जातात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



0 Comments