संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतादरम्यान देउळगावमही येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे शाखा व्यवस्थापक संजय रामकिसन शिंगणे यांचे तब्बल ४६ हजार ५०० रुपये खिशातून अचानक गहाळ झाले किंवा अज्ञात चोरट्याने ते लंपास केले असल्याची तक्रार देउळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पालखी दर्शनासाठी गेले असता घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै २०२६ रोजी ग्राम देउळगावमही येथे संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे आगमन झाले होते. यावेळी बुलढाणा अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक संजय शिंगणे (वय ५३ वर्ष, रा. देउळगावमही) हे दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास आर्मचे बँकेच्या शाखेसमोर पालखीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेत असताना त्यांच्या पॅंटच्या उजव्या खिशात ठेवलेले घरखर्चाचे वैयक्तिक रोख ४६,५०० रुपये (५०० रुपयांच्या ९३ नोटा) अचानक गायब झाले.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू
पैसे गहाळ झाल्याचे लक्षात येताच शिंगणे यांनी तात्काळ परिसरात आणि आजूबाजूला शोध घेतला. तसेच स्थानिक दुकाने आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात आले; मात्र गर्दीमुळे त्यात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा ठोस पुरावा आढळून आला नाही.
पैसे नेमके कुठे पडले की गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने ते खिशातून पळवले, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी संजय शिंगणे यांनी देउळगाव राजा पोलीस ठाण्याचे मा. ठाणेदार यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पालखी सोहळ्याच्या गर्दीत अशी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

0 Comments