लोणार (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी) :लोणार तालुक्यातील आरोग्य सेवेला सक्षम व गतिमान करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दैवशाला बलशेटवाड यांची ठाणे येथे बदली झाल्याने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आयोजित निरोप समारंभात लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने डॉ. बलशेटवाड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. अनिल मापारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डॉ. बलशेटवाड यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन लोकाभिमुख आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले. त्यांची कार्यतत्परता, शिस्तबद्ध नियोजन आणि रुग्णसेवेप्रती असलेली बांधिलकी कायम स्मरणात राहील, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे विभागीय संघटक शेख समद शेख अहमद, लोणार तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गोपाल तोष्णीवाल, सचिव सचिन गोलेच्छा, लोकमत प्रतिनिधी रहमान नैवरंगाबादी, पत्रकार किशोर मोरे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. दैवशाला बलशेटवाड यांना पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

0 Comments