मेहकर पोलिसांचा 'सिंघम' अवतार! रिसोड-सोनाटी रोडवरून भरधाव पळणाऱ्या 'त्या' लाल कारला गणपूर फाट्यावर पडली गराडा; २ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
मेहकर तालुक्यात पोलिसांनी एका अत्यंत धाडसी आणि धडक कारवाई करत गुन्हेगारी वर्तुळाला मोठा धक्का दिला आहे. मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई असलेला आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक कुख्यात अट्टल गुन्हेगार आपल्या साथीदारांसह एका लाल रंगाच्या कारमधून मेहकर शहराच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस यंत्रणेने कमालीची सतर्कता दाखवत क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण परिसरात नाकेबंदी करून या टोळीला शिताफीने जेरबंद केले.


भरधाव कारचा सिनेस्टाईल पाठलाग

मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड-सोनाटी रस्त्यावरून मेहकरच्या दिशेने येणारी 'जगदंब' नाव लिहिलेली लाल रंगाची कार (क्र. MH-31-FA-5820) पोलिसांना संशयास्पद स्थितीत दिसून आली. पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने कारचा वेग वाढवून ती बायपास मार्गे सारंगपूर-बरटाळा फाट्याच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगाने पळवून नेली. यानंतर मेहकर पोलिसांनी चित्रपटाच्या दृश्यांप्रमाणे मागून थरारक पाठलाग करत अखेर गणपूर फाट्याजवळ या कारला वेढा टाकून यशस्वीरीत्या अडवले.

दोन आरोपी जाळ्यात, शस्त्रसाठा जप्त

कार थांबताच आतील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक जण फरार झाला, मात्र पोलिसांनी दोघांना पाठलाग करून जागीच पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल परात्या भोसले (वय २५, रा. बरटाळा) आणि अजय दहीमल भोसले (वय २६, रा. वरदडा) अशी आहेत. मुख्य आरोपी अमोल भोसले याच्यावर बुलढाणा, वाशीम, नांदेड, लातूर यांसह विविध जिल्ह्यांत खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली असता, त्यात लाकडी मुठीचा मोठा सुरा, धारदार सुरी, चाकू, ऑटोमॅटिक चाकू आणि मोबाईल असा शस्त्रास्त्रांचा साठा मिळून आला. पोलिसांनी कारसह एकूण २ लाख ६६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

'या' शूर पोलीस पथकाने बजावली धडाकेबाज कामगिरी:

सदरची उल्लेखनीय आणि धाडसी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस ठाण्याच्या जवानांनी यशस्वी करून दाखवली. यामध्ये सहभागी असलेले अधिकारी व अंमलदार खालीलप्रमाणे आहेत:
मार्गदर्शन: मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (मेहकर) श्री. संतोष खाडे तसेच श्री. सोहन माचरे.
नेतृत्व: पोलीस निरीक्षक श्री. व्यंकटेश्वर आलेवार.
तपास व अंमलबजावणी पथक:
सपोनि. संदिप बिरांजे, सपोनि. प्रदीपकुमार राठोड.
पोउपनि. किरण खाडे.
ASI सुखदेव गव्हाणे.
पोहेकॉ. संजय पवार, पोहेकॉ. लक्ष्मण कटक, पोहेकॉ. प्रभाकर शिवणकर.
पोकॉ. समाधान अरमाळ, पोकॉ. मोहम्मद परसुवाले, पोकॉ. केशव अवचार, पोकॉ. करीम शहा, पोकॉ. अमोल बोर्डे, पोकॉ. गणेश वैद्य, पोकॉ. विनोद फुफाटे, पोकॉ. मनिष बाजड, पोकॉ. नितीन डुकरे.
चालक पोहेकॉ. संदिप भोंडाणे आणि पोकॉ. संजय पहारे.

या यशस्वी कामगिरीबद्दल मेहकर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ४५७/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच सहकलम १३५ म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीच्या शोधासाठी प्रतापपूर, उकळी परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवले जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments