ग्रामपंचायतीने जारी केली अधिकृत नोटीस, सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन!
सुलतानपूर येथील खेळाडू आणि भरती पूर्व तयारी करणाऱ्या तरुणांनी २० जुलै रोजी ग्रामपंचायतीवर काढलेल्या धडक मोर्चानंतर अखेर प्रशासनाला चक्रे वेगाने फिरवावी लागली आहेत. तरुणांनी मांडलेल्या हक्काच्या क्रीडांगण (स्पोर्ट्स ग्राउंड) आणि व्यायाम सुविधेच्या मागणीवर तातडीने निर्णय घेण्यासाठी सुलतानपूर ग्रामपंचायतीने शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता 'विशेष ग्रामसभा' आयोजित केली आहे. यासंदर्भातील अधिकृत नोटीस (जा.क्र./ग्राप सुलतानपूर/३४४/२०२६) ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केली आहे.
तरुणांच्या एकजुटीचा दणका; अवघ्या काही तासांत नोटीस जारी!
सोमवारी गावातील १०० ते १५० तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयात स्मरणपत्र सादर केले होते."१४ ऑगस्टपर्यंत प्रश्न मार्गी लावू" असे लेखी आश्वासन दिल्यानंतर, ग्रामपंचायतीने केवळ कागदी आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. विशेष ग्रामसभेची नोटीस काढून या विषयाला कायदेशीर आणि प्रशासकीय मंजुरी देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
विशेष ग्रामसभेची विषय पत्रिका:
ग्रामपंचायतीने जारी केलेल्या नोटिसीनुसार सभेमध्ये खालील प्रमुख विषयावर चर्चा होऊन ठराव मंजूर केला जाणार आहे:
1)मौजे सुलतानपूर येथील मुला-मुलींसाठी स्वतंत्र क्रीडांगण (मैदान) व व्यायाम सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत.
2)मा. अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय.
सदर नोटीस ग्रामपंचायतीकडून तहसिलदार लोणार, गटविकास अधिकारी (BDO) लोणार, पोलीस निरीक्षक मेहकर आणि मंडळ अधिकाऱ्यांना माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.
शुक्रवारी ग्रामपंचायतीत भरणार 'तरुणांचा दरबार'; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन!
हा निर्णय म्हणजे सुलतानपूरच्या क्रीडाप्रेमी तरुणांच्या एकजुटीचा आणि सनदशीर मार्गाने दिलेल्या लढ्याचा पहिला मोठा विजय मानला जात आहे. २४ जुलैच्या या विशेष ग्रामसभेत क्रीडांगणासाठी जागेची निश्चिती आणि प्रशासकीय ठराव मंजूर केला जाणार आहे.
त्यामुळे, "गावातील सर्व मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला, आझाद व जय भवानी क्रिकेट क्लबचे खेळाडू आणि सर्व तरुणांनी या ऐतिहासिक विशेष ग्रामसभेला शुक्रवारी सकाळी ११:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन क्रीडाप्रेमी तरुण व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments