बुलढाणा शहरात खळबळबळ उडवून देणाऱ्या कन्हाळे ले-आऊट येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिर चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अवघ्या २४ तासांत यश आले आहे. देवाच्या घरावर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांच्या या सुपरफास्ट आणि धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात तीव्र खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय होती?
१६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ च्या दरम्यान, कन्हाळे ले-आऊट येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिरात एका अज्ञात चोरट्याने डल्ला मारला होता. मंदिरातील देवाचे चांदीचे अवयव आणि मौल्यवान पितळी-तांब्याचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवित्र मंदिरातील चोरीमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्तहेरांचे जाळे आले कामी
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. दरम्यान, एलसीबीच्या चतुर सळसळत्या पथकाला गुप्तबातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी आकाश शिवरतन बाहेती (वय ५० वर्षे, रा. पवार ले-आऊट, सोळंकी हॉस्पिटलच्या मागे, बुलढाणा) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
१०० टक्के मुद्देमाल जप्त
पोलीस कारवाईदरम्यान आरोपीकडून मंदिरातून चोरीला गेलेला १८ हजार ५०० रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये खालील साहित्याचा समावेश आहे:
चांदीचे ४ डोळे आणि नाक (किंमत १०,००० रुपये)
तांब्याची दोन लहान-मोठी भांडी (किंमत ६,५०० रुपये)
पितळी समई (किंमत २,००० रुपये)
पितळी नंदादीप (किंमत ३०० रुपये)
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई
सदरची धडाकेबाज कामगिरी बुलढाणा पोलीस अधीक्षक नीलेश राजपूत, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, शेख चांद यांच्या पथकाने बजावली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी बुलढाणा शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. एलसीबीच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments