मतदार यादीत 'अंतरवासना' अन् 'बिस्तर पर जाना'; चिखलीतील रायपूर गावात नेमकं चाललंय काय?

चिखली (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
चिखली विधानसभा मतदारसंघातील रायपूर गावाच्या अधिकृत मतदार यादीमध्ये अत्यंत संशयास्पद आणि विचित्र नावांचा समावेश झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदार यादीत चक्क अपशब्दांसारखी आणि निरर्थक नावे आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक आमदार श्वेता महाले पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


मतदार यादीत आढळलेली काही आक्षेपार्ह नावे:

मतदार यादीची पडताळणी करताना कोणत्याही गावात अस्तित्वात नसलेली खालीलप्रमाणे विचित्र नावे आढळून आली आहेत:
"मोहम्मद अफगानिस्तान"
"बिस्तर पर जाना"
"पुराना"
"तेलंगू विकास खिलाडी"
"प्रोडक्ट का जानकारी"
"साकी" आणि "अंतरवासना"
विशेष म्हणजे, या नावांच्या कोणत्याही व्यक्ती प्रत्यक्षात रायपूर गावात वास्तव्यास नसल्याचे उघड झाले आहे.

लोकशाहीच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह: आमदार श्वेता महाले

या गंभीर प्रकारावर बोलताना आमदार श्वेता महाले म्हणाल्या की, "मतदार यादी हा भारतीय लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील पाया आहे. त्यामुळे या यादीतील प्रत्येक नोंद ही अचूक, खरी आणि पात्र भारतीय नागरिकाचीच असणे बंधनकारक आहे. मतदार यादीत अशा प्रकारे चुकीच्या, बनावट किंवा संशयास्पद नोंदी राहिल्यास निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते."

त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तसेच यामध्ये काही अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

आमदार महाले यांनी मतदारसंघातील जनतेला आवाहन केले आहे की, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनीही सजग राहून सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.
"प्रत्येक नागरिकाने आपल्या गावातील मतदार यादी स्वतः तपासून पाहावी. जर कोणतीही नोंद संशयास्पद वाटल्यास, आवश्यक पुराव्यांसह तात्काळ निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा निवडणूक आयोगाकडे आपली हरकत नोंदवावी. योग्य पडताळणीनंतरच अशा नावांवर अंतिम निर्णय घेतला जाईल."
भारतीय लोकशाहीत मतदानाचा अधिकार केवळ पात्र भारतीय नागरिकांचाच असून, कोणत्याही बनावट नोंदींना यात स्थान मिळता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments