गुलशेर शेख दुसरबीड : जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल, दुसरबीड येथील इयत्ता तिसरीचा कर्तृत्ववान विद्यार्थी विनायक विजय मोगल याने नुकत्याच झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2026 मध्ये महाराष्ट्र राज्यातून दुसरा क्रमांक मिळवून शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
विनायकच्या या उल्लेखनीय यशामुळे त्याची इस्रो - ISRO सहलीसाठी देखील निवड करण्यात आली आहे. ही शैक्षणिक सहल भारत टॅलेंट सर्च परीक्षेतील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते.
नुकत्याच अहिल्यानगर येथे झालेल्या भव्य बक्षीस वितरण सोहळ्यात विनायकचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यात राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी सहभागी झाले होते.
विनायकने सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक पि.एस. खार्डे, सर्व शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
शाळेच्या संचालिका डॉ. शिल्पा कायंदे मॅडम यांनी विनायकचे अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांच्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले.
मुख्याध्यापक म्हणाले, "विनायक हा अत्यंत हुशार, शिस्तप्रिय आणि जिज्ञासू विद्यार्थी आहे. त्याने मिळवले यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शाळेला त्याचा सार्थ अभिमान आहे."
विनायकच्या आई-वडिलांनीही शाळेच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जिजाऊ इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याने राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवल्याने संपूर्ण दुसरबीड परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

0 Comments