अमडापूर:नाक दाबायला लावणारी दुर्गंधी... पोलिसांनी वाहनाची झडती घेताच उघड झाला मोठा प्रकार!

अमडापूर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
अमडापूर बसस्थानक परिसरात रात्री उशिरा संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनावर अमडापूर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात जनावरांची शिंगे जप्त केली. वाहनातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता काळ्या ताडपत्रीखाली पांढऱ्या पोत्यांमध्ये भरलेली जनावरांची शिंगे आढळून आली.


मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास चिखलीकडून आलेले एक टाटा मेगा पिकअप वाहन अमडापूर बसस्थानकाजवळ उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाहनातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

पोलीस अधिकाऱ्यांनी चालकाची चौकशी केली असता त्याने समाधानकारक माहिती देऊ शकली नाही. वाहनाची सखोल झडती घेतली असता सुमारे २५ पोत्यांमध्ये विविध आकारांची जनावरांची शिंगे भरलेली असल्याचे समोर आले. काही शिंगे पोत्यांबाहेरही पडलेली होती.

या कारवाईत अंदाजे अडीच क्विंटल वजनाची शिंगे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत सुमारे २५ हजार रुपये असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. शिंगांमधून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तपासादरम्यान वाहनचालकाकडे अशा प्रकारच्या मालाच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी नसल्याचेही स्पष्ट झाले. पशुधन विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नमुने ताब्यात घेतले असून पुढील वैज्ञानिक तपासणी सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अमडापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बेकायदेशीर वाहतुकीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments