रुग्णसेवेसोबतच पर्यावरण रक्षणाचा वसा! सुलतानपूरच्या डॉक्टरांनी 'डॉक्टर्स डे' निमित्त राबवला अनोखा उपक्रम
'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश देत आणि पर्यावरण रक्षणाचा वसा घेत, आज १ जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर्स डे' निमित्त सुलतानपूर येथील डॉक्टर असोसिएशन आणि नर्सिंग कॉलेजच्या वतीने एक स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. डॉक्टरांनी केवळ रुग्णांची सेवा न करता, समाजाच्या आरोग्यासाठी स्वखर्चाने गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. तसेच भव्य रॅली काढून ग्रामस्थांमध्ये पर्यावरण आणि आरोग्याविषयी जनजागृती केली.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ईदगाहपर्यंत वृक्षारोपण मोहीम
सकाळी ठीक १० वाजता या मोहिमेची सुरुवात झाली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पहिले झाड लावून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासमोर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर अत्यंत उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
यानंतर हा जत्था स्थानिक सरकारी दवाखाना परिसरात पोहोचला, तिथे सर्व डॉक्टरांनी मिळून वृक्षारोपण केले आणि शेवटी ईदगाह मैदानावर जाऊन मोठ्या प्रमाणावर झाडे लावून राष्ट्रीय एकात्मतेचा व सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.
नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केले देखावे
या मोहिमेत 'डॉ. आर एन लाहोटी कॉलेज ऑफ नर्सिंग, सुलतानपूर'च्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. डॉक्टरांसोबत गावातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आकर्षक देखावे सादर केले. या माध्यमातून डॉक्टरांचे समाजातील स्थान, त्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व डॉक्टरांची उपस्थिती
या चांगल्या कामात सुलतानपूर येथील सर्व डॉक्टर मंडळी एकवटली होती. ज्येष्ठ डॉक्टर हेमराज लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर असोसिएशन सुलतानपूरचे अध्यक्ष डॉ. अमोल बोराळकर, उपाध्यक्ष डॉ. समाधान वाघ, कोषाध्यक्ष सचिन देसाई, सचिव शशीराज लाहोटी यांच्यासह गावातील सर्व डॉक्टरांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. विनोद भानपुरे यांनी केले.
ग्रामस्थांचे लाभले मोठे सहकार्य
डॉक्टरांच्या या आरोग्याभिमुख आणि पर्यावरणपूरक उपक्रमाला सुलतानपूरमधील नागरिकांनीही भरभरून दाद दिली. या प्रसंगी भागवत पडघान, मोईन खान, विकास गाडे, शेख लतिफ, आनंद झोरे, दिलीप सुरुशे, जमीर सेठ, शेख खाजा भाई, शेख गणी भाई, सुरेश मोरे, रमेश भानापुरे, शेख अजहर, जाकीर खान आणि इतर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टरांना मोलाचे सहकार्य केले.
"लोकांनी निरोगी व सुरक्षित राहावे आणि झाडांपासून सर्वांना शुद्ध हवा व उत्तम आरोग्य लाभावे, याच उद्देशाने आम्ही सर्वांनी मिळून गावात ठिकठिकाणी व धार्मिक स्थळांच्या परिसरात वृक्षारोपणाचा निर्णय घेतला."
— डॉक्टर असोसिएशन, सुलतानपूर
पर्यावरण जतनासोबतच समाज प्रबोधनाचा आणि सर्वधर्मसमभावाचा एक नवा आदर्श सुलतानपूरच्या डॉक्टरांनी या निमित्ताने समाजासमोर ठेवला आहे, अशा शब्दांत संपूर्ण परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.



.jpeg)

0 Comments