ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आयुर्वेद शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळावी, या उद्देशाने शिक्षणमहर्षी मा. संजयजी लाहोटी यांनी स्थापित केलेल्या डॉ. आर. एन. लाहोटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये नुकतेच 'बाम मेकिंग' (बाम निर्मिती) वर्कशॉप अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील तब्बल २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बाम तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.
महाविद्यालयात आधुनिक शैक्षणिक सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा आणि अध्यापनास पूरक रुग्णालयाची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक (किताबी) ज्ञान न मिळता, प्रत्यक्ष औषध निर्मितीचा अनुभव मिळावा या हेतूने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
गरीब रुग्णांना फायदा व्हावा: मा. संजय लाहोटी
"विद्यार्थ्यांनी भविष्यात केवळ इथेच न थांबता अशाच प्रकारे विविध आयुर्वेदिक औषधे स्वतः तयार करावीत आणि या ज्ञानाचा फायदा तळागाळातील गरीब व गरजू रुग्णांना मिळावा," अशी अपेक्षा महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. संजय लाहोटी यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच, "अशा वैविध्यपूर्ण आणि प्रात्यक्षिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची आयुर्वेदातील आवड अधिक दृढ होईल आणि त्यांच्यातील कौशल्य वाढेल," असा विश्वास संस्थेचे सचिव मा. सोमेश लाहोटी यांनी व्यक्त केला.
प्राचार्यांचे थेट मार्गदर्शन
या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विहार बिडबई सर यांनी विद्यार्थ्यांना 'लिप बाम' आणि 'पेन बाम' (वेदनाशामक बाम) अगदी सोप्या पद्धतीने कसे तयार करावे, याचे सविस्तर मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. स्वप्नील मुंढे, डॉ. अविनाश कावरे, डॉ. परमेश्वर कांगणे आणि डॉ. श्वेता भेंडे आदी शिक्षकवृंदाने सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष दीपक नवगजे, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments