महा-ई-सेवा व आधार केंद्र चालकांचा आज 'कामबंद' एल्गार! आझाद मैदानावर ऐतिहासिक राज्यव्यापी आंदोलन.


महाराष्ट्र(गावकरी टाइम्स):
राज्यातील लाखो नागरिकांना विविध शासकीय सेवा, दाखले आणि डिजिटल साक्षरता पुरवणाऱ्या 'अखिल स्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटना, महाराष्ट्र राज्य' च्या वतीने उद्या, १ जुलै २०२६ (बुधवार) पासून मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर तीव्र राज्यव्यापी धरणे व कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.


शासनाने केंद्र चालकांच्या (VLE) प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने केलेल्या दुर्लक्षामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महा ई-सेवा, आपले सरकार सेवा केंद्र आणि आधार केंद्र चालक संतप्त झाले असून, उद्या राज्यातील सर्व केंद्रे पूर्णपणे बंद राहणार आहेत. जर उद्याच्या आंदोलनानंतर शासनाने ठोस आणि सकारात्मक तोडगा काढला नाही, तर हा लढा आणि कामबंद आंदोलन पुढेही अविरतपणे चालूच राहील, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे.

 आंदोलनाची प्रमुख पार्श्वभूमी आणि कारणे:

संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमर पवार आणि सचिव श्री. विनोद तायडे यांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्र्यांपासून ते विविध खात्यांच्या मंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. प्रशासनाकडून नव्याने सुरू करण्यात आलेले व्हॉट्सॲपवरील दाखले, महासारथी पोर्टल, ग्रामपंचायत व महाविद्यालय स्तरावरील अनधिकृत आयडी यामुळे आधीच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकृत महा ई-सेवा केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षानुवर्षे सेवा देऊनही केंद्र चालकांच्या रोजगाराला कोणतेही संरक्षण मिळालेले नाही.

केंद्र चालकांच्या प्रमुख न्याय्य मागण्या:

१. VLE साठी मानधन व सन्मान: राज्यातील विद्यमान 'आपले सरकार' सेवा केंद्र चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करून त्यांना निश्चित मानधन लागू करावे.
२. नवीन केंद्र मंजुरीला स्थगिती: सद्यस्थितीत नवीन केंद्रांची मंजुरी तात्काळ थांबवण्यात यावी, जेणेकरून जुन्या चालकांचे नुकसान होणार नाही.
३. तांत्रिक अडचणींचे निवारण: Maha IT पोर्टलवरील वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि सर्व्हरच्या समस्या तात्काळ दूर कराव्यात.
४. अनधिकृत आयडी बंद करा: ग्रामपंचायत, महाविद्यालय स्तरावरील आणि निष्क्रिय असणारे सर्व अनधिकृत आयडी तपासून बंद करण्यात यावेत.
५. सुरक्षा आणि विमा: केंद्र चालकांसाठी अपघात विमा, आरोग्य विमा आणि व्यवसाय संरक्षण योजना लागू करावी.
६. कमिशन दरांचे पुनर्रचना: वाढती महागाई, इंटरनेट व कार्यालयाचा खर्च लक्षात घेता कमिशन दरांमध्ये भरीव वाढ करण्यात यावी.

 नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन:

या आंदोलनामुळे राज्यातील डिजिटल सेवा, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, महसूल संकलन आणि प्रमाणपत्र वितरण काही काळ प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी केंद्र चालकांनी घेतलेल्या या भूमिकेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
"विभागलो तर संपलो... एकत्र आलो तर जिंकू! हक्क आमचा, मिळवणारच!" या घोषणेसह उद्या सकाळी १०:०० वाजल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो केंद्र चालक कुटुंबियांसह आझाद मैदानावर धडकणार आहेत. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास हा संप अधिक तीव्र होणार हे निश्चित!
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments