महिलांच्या सुरक्षेसाठी देऊळगाव राजा पोलिसांचे ‘दामिनी पथक’; छेडछाड करणाऱ्यांवर राहणार करडी नजर


देऊळगाव राजा (सय्यद सादिक/गावकरी टाइम्स ):
महिलांवरील अत्याचार, छेडछाड आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी देऊळगाव राजा पोलिसांनी विशेष पुढाकार घेत ‘दामिनी पथक’ कार्यान्वित केले आहे. महिला व मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे तसेच गर्दीच्या भागांमध्ये या पथकाकडून नियमित गस्त घालण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात येणार असून संशयास्पद हालचालींवरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे महिला, विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांमुळे महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. आता अशा घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष यंत्रणा उभी केल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दामिनी पथकात प्रशिक्षित महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, गरज पडल्यास त्वरित मदत व संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच महिलांनी कोणतीही घटना लपवून न ठेवता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस प्रशासनाने उचललेले हे पाऊल समाजात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट करणारे ठरणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेनेही हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करून संशयास्पद प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments