बुलढाणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचा राज्यात डंका; 'सक्षम फार्मसी' अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद!

सक्षम फार्मसी- सुरक्षित व्यवसाय' अभियान आता राज्यभर राबविणार: अनिलभाऊ नावंदर यांची मोठी घोषणा


बुलढाणा (गावकरी टाइम्स प्रतिनिधी):
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक आणि शिस्तप्रिय भूमिकेनंतर आता राज्यातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट कमालीचे सक्रिय झाले आहेत. नियमांचे काटेकोर पालन करत रुग्णहित जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने कायदेशीर जागरूकतेचा विडा उचलला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 'सक्षम फार्मसी – सुरक्षित व्यवसाय' हे अभियान राबवण्यात आले, ज्याला औषध विक्रेत्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बुलढाणा जिल्ह्याचा हा यशस्वी पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाणार असल्याची घोषणा राज्य सचिव अनिलभाऊ नावंदर यांनी केली आहे.


महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पासाहेब) शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि अनिलभाऊ नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा असोसिएशनने ही धडक मोहीम हाती घेतली होती.
१३ तालुक्यांत १०३ तज्ज्ञांची फौज; 'बुलढाणा-खामगाव' आघाडीवर, 'नांदुरा' पॅटर्नचे कौतुक
या संपूर्ण मोहिमेची धुरा प्रोजेक्ट लिडर गणेश बंगळे यांनी सांभाळली. त्यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करत राज्यातील पहिल्या आणि मोठ्या मोहिमेचा यशस्वी समन्वय केला. या मोहिमेत जिल्ह्यातील १०३ तज्ज्ञ फार्मासिस्ट, अनुभवी केमिस्ट आणि फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
या पथकांनी रणरणत्या उन्हाची पर्वा न करता जिल्ह्यातील तब्बल १३ तालुक्यांमध्ये एकाच दिवशी १०५४ औषध पेढ्यांना (मेडीकल्स) प्रत्यक्ष भेटी दिल्या. यामध्ये बुलढाणा आणि खामगाव तालुक्याने सर्वाधिक दुकानांपर्यंत पोहोचत बाजी मारली, तर नांदुरा तालुक्याने केलेल्या व्हीआयपी नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी कशाची झाली तपासणी आणि काय मिळाले मार्गदर्शन?
औषध प्रशासनाच्या कारवाईचा बडगा टाळण्यासाठी आणि औषध व्यवसाय अधिक सुरक्षित करण्यासाठी पथकाने दुकानदारांना खालील मुद्द्यांवर थेट मार्गदर्शन केले:
फार्मासिस्टची उपस्थिती: मेडिकलवर परवानाधारक फार्मासिस्ट हजर असणे अनिवार्य.
Schedule H/H1 चे नियम: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे न देणे व त्यांच्या अचूक नोंदी ठेवणे.
कोल्ड चेन व बिलिंग: आवश्यक औषधांसाठी शीतसाखळी (Freezer) व्यवस्थापन आणि प्रत्येक ग्राहकाला कॉम्प्युटराइज्ड बिल देणे.
एक्सपायरी मॅनेजमेंट: कालबाह्य झालेली औषधं मुख्य साठ्यापासून वेगळी ठेवणे आणि विविध कायदेशीर रजिस्टर्स अद्ययावत ठेवणे.
भीती नाही, तर सहकार्याची भावना!
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील बहुतांश औषध पेढ्या अत्यंत स्वच्छ, शिस्तबद्ध आणि नियमांचे पालन करणाऱ्या आढळल्या. काही ठिकाणी किरकोळ त्रुटी आढळल्या, तिथे पथकाने दंडात्मक भीती न दाखवता त्या कशा सुधाराव्यात याचे धडे दिले. "मार्गदर्शनातून अनुपालन, अनुपालनातून सुरक्षित व्यवसाय" हे बोधवाक्य घेऊन राबवलेली ही मोहीम जिल्ह्यातील औषध व्यवसायाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या ऐतिहासिक मोहिमेसाठी जिल्हाध्यक्ष गजाननजी शिंदे, जिल्हा सचिव रामचंद्रजी आयलानी, झोन संघटन सचिव राजेंद्रजी नहार, प्रेमकाका जैन, राजूभाऊ पाटील यांच्यासह सर्व तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments