भरारी पथकाचा दणका: पुरावा नष्ट करण्यासाठी औषध विक्रेत्यांचे धक्कादायक पाऊल; नागरिक भीतीच्या छायेत.

देऊळगाव राजा (सय्यद सादिक/गावकरी टाइम्स ):
बुलढाणा जिल्ह्यात औषध प्रशासनाच्या धडक कारवायांमुळे अनेक मेडिकल चालकांचे धाबे दणाणले असतानाच देऊळगाव राजा-बुलढाणा मार्गावरील बायपास परिसरात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य व संशयास्पद औषधांचा साठा जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बायपासजवळील झाडाझुडपांमध्ये विविध प्रकारच्या गोळ्या, सिरपच्या बाटल्या, इंजेक्शनचे पॅक, औषधांचे बॉक्स आणि वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणात टाकून देण्यात आले आहे. यामध्ये काही औषधे मुदतबाह्य झालेली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या भागात लहान मुले खेळण्यासाठी तसेच गुरेढोरे चराईसाठी येत असतात. अशा परिस्थितीत ही औषधे त्यांच्या संपर्कात आल्यास गंभीर आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात. विशेषतः रंगीत गोळ्या किंवा सिरपच्या बाटल्या मुलांच्या हाती लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नियमांनुसार मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट बायो-मेडिकल वेस्ट व्यवस्थापनाच्या नियमानुसार वैज्ञानिक पद्धतीने लावणे बंधनकारक आहे. मात्र कारवाईच्या भीतीपोटी काहींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ही औषधे जंगलात टाकल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

पर्यावरणालाही या प्रकारामुळे धोका निर्माण झाला असून औषधांतील रासायनिक घटकांमुळे माती व भूजल प्रदूषित होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित मेडिकल चालक किंवा जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

औषध प्रशासनाने व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून नमुने तपासणीसाठी पाठवावेत तसेच दोषींवर औषध व सौंदर्यप्रसाधन कायदा, बायो-मेडिकल वेस्ट नियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

"एक चूक लपवण्यासाठी दुसरी मोठी चूक केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा व्हावी," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments