बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर-डोणगाव मार्गावरील हिवरा साबळे फाट्याजवळ आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एक अंगावर काटा आणणारा अत्यंत भीषण अपघात घडला. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रूझर वाहनाला लोखंडी अँगलची बेकायदेशीर आणि जीवघेणी वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ट्रक मधील तब्बल २५ फुटी लोखंडी अँगल क्रूझरच्या समोरील केबिनचा चक्काचूर करत थेट आतमध्ये घुसले. सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक वऱ्हाडी गंभीर जखमी झाले असून, सर्व प्रवासी मृत्यूच्या दाढेतून बालंबाल बचले आहेत.
महिला व चिमुकले थोडक्यात बचावले!
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास डोणगावकडून मेहकरच्या देशाने लग्नाचे वऱ्हाड घेऊन एक क्रूझर वाहन (क्रमांक MH 37 AH 2722) जात होते. याच वेळी विरुद्ध दिशेने म्हणजेच मेहकरकडून डोणगावच्या दिशेने एक मालवाहू आयशर ट्रक (क्रमांक MH 47 Y 3976) येत होता. हिवरा साबळे फाट्याजवळ हे दोन्ही वाहने समोरासमोर आली आणि त्यांच्यात जोरदार धडक झाली.
अपघाताच्या वेळी क्रूझर वाहनाच्या समोरील सीटवर महिला आणि लहान मुले बसलेली होती. ट्रकने दिलेल्या धडकेनंतर ट्रक मधील २५ फुटी लोखंडी अँगल थेट क्रूझरची काच फोडून चालकाच्या बाजूने आतमध्ये घुसले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रसंग इतका भयावह आणि काळजाचा ठोका चुकवणारा होता की, काही इंचाच्या फरकाने महिला आणि लहान मुलांचे प्राण वाचले.
केबिनचा चक्काचूर; जखमींवर उपचार सुरू
या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की क्रूझरच्या केबिनचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वऱ्हाड्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ वाहनातून बाहेर काढण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी मेहकर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

0 Comments