मेहकर तालुक्यातील जाणेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका ३२ वर्षीय नराधमाने घरात ओढून नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, घटनेची माहिती मिळताच जाणेफळ पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधम आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक केली आहे.
गोठ्यातून शेण आणायला गेली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घराशेजारीच असलेल्या गोठ्यातून घर सारवण्यासाठी शेण आणायला गेली होती. याच वेळी तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या विष्णू बबन बोराडे (वय ३२) याने आजूबाजूला कोणीही नसल्याचे पाहून आणि अंधाराचा फायदा घेत मुलीला बळजबरीने घरात ओढून नेले व तिच्यावर अत्याचार केला.
दुपारी घटना उघडकीस, नराधम जेरबंद
हा भयंकर प्रकार घडल्यानंतर पीडितेने घडलेली सर्व आपबिती आपल्या आईला सांगितली. त्यानंतर नातेवाईकांसह पोलीस ठाणे गाठून नराधमाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. ९ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जाणेफळचे ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे चक्रे फिरवली. आरोपी विष्णू बबन बोराडे हा गावातून पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु, पोलिसांनी पाठलाग करून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्याला वरवंड शेतशिवारांमधून ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासांतच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पोलीस पथकाची कौतुकास्पद कामगिरी
ही धडक कारवाई ठाणेदार अजिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, पोहेकॉ पंढरीनाथ काकड, पोलीस अंमलदार लक्ष्मण मिटकर, पोलीस शिपाई नीता पवार आणि अमोल अंभोरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आरोपीला पळून जाण्यापूर्वीच बेड्या ठोकण्यात यश आले आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 Comments