एसटी वाहकाची देवमाणुसकी! मुलाच्या फीसाठी ठेवलेले ४५ हजार रुपयांनी भरलेली बॅग प्रामाणिकपणे केली परत!

चिखली (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
'प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे' याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत सुखद आणि कौतुकास्पद घटना जाफराबाद ते जालना बस प्रवासादरम्यान घडली आहे. एका प्रामाणिक बस वाहकामुळे (कंडक्टर) एका गरीब माऊलीचे आणि तिच्या मुलाचे शैक्षणिक वर्षाचे मोठे नुकसान टळले आहे.


शाळेची फी भरायला चालले होते मायलेक

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. अनिता काकडे आणि त्यांचा १० वर्षांचा मुलगा शिवम गजानन काकडे (रा. भोसा, ता. चिखली, जि. बुलढाणा) हे जाफराबाद येथून जाफराबाद-जालना बस (क्र. ८९६९) मध्ये बसले होते. मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी ते जालना येथे जात होते. त्यांच्याकडे फी भरण्यासाठी ४५,००० रुपये रोख असलेली एक बॅग होती.

 बसमध्ये विसरली पैशांची बॅग

जालना येथे पोहोचल्यानंतर सर्व प्रवासी गाडीतून उतरून गेले. घाईघाईत अनिता काकडे आणि त्यांचा मुलगा पैशांची बॅग बसमध्येच विसरले. बस रिकामी झाल्यानंतर वाहक (कंडक्टर) श्री. दीपकराव डिघोळे हे बसची नियमित तपासणी करत असताना, त्यांना सीटच्या बाजूला एक बेवारस बॅग पडलेली आढळली. त्यांनी ती बॅग सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतली.

 रडत-रडत शोधत आले मायलेक, वाहकाने दिला धीर

काही वेळातच बॅग हरवल्याचे लक्षात आल्यावर ती महिला प्रवासी आणि तिचा १० वर्षांचा मुलगा रडत-रडत, धापा टाकत बसकडे धावत आले. "आमची बॅग हरवली आहे, कुणाला दिसली का?" असे ओरडत ते चौकशी करू लागले. त्या माऊलीची आणि लहान मुलाची ती अवस्था पाहून वाहक श्री. डिघोळे यांनी त्यांना तात्काळ धीर दिला.

 ४५ हजारांची बॅग सुपूर्द; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

श्री. डिघोळे यांनी कसलीही शंका न बाळगता अत्यंत प्रामाणिकपणे ती ४५,००० रुपयांची बॅग त्या महिलेच्या स्वाधीन केली. आपली हक्काची आणि कष्टाची रक्कम सुखरूप परत मिळाल्याचे पाहून त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी आणि त्यांच्या मुलाने रडत-रडतच वाहक श्री. डिघोळे यांचे हात जोडून आभार मानले.

आजच्या काळात जिथे पैशांसाठी माणूस स्वार्थांध होतो, तिथे श्री. दीपकराव डिघोळे यांनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा समाजासाठी अत्यंत आदर्श असा आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल एसटी प्रशासनासह सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि त्यांना मानाचा मुजरा केला जात आहे!
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments