मराठी साहित्यात आपल्या प्रभावी कविता, रसाळ निवेदनशैली आणि साहित्यसेवेच्या बळावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करणारे प्रख्यात कवी व निवेदक अजीम नवाज राही यांचा साखरखेर्डा येथे पोलीस विभागाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
पलसिद्ध मठ सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे नवे ठाणेदार युवराज रबडे, स्थानांतरित ठाणेदार गजानन दिगंबरराव करेवाड तसेच दुय्यम ठाणेदार गणेशराव डोईफोडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन अजीम नवाज राही यांचा गौरव करण्यात आला.
अजीम नवाज राही यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या 'बादल' या कथेचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. भाग-२च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या 'वळीवाच्या वेळा' या कवितासंग्रहाला प्रसाद बाण उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार (नांदेड), लोकनेते स्व. राजारामबापू पाटील पुरस्कार (इस्लामपूर) आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा धम्माल रत्नाकर सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार २०२५ असे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस विभागाने त्यांचा सन्मान करून साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजीम नवाज राही यांच्या साहित्यकृती नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या भावी साहित्यप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास साहित्यप्रेमी, नागरिक, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
.jpeg)
0 Comments