जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा बजावताना वीरमरण आलेले भारतीय सैन्याच्या ३३ मिडीयम रेजिमेंटमधील हवालदार अंकुश महादेव मिसाळ हे सोमवारी (दि. २९ जून) दुपारी २ वाजेच्या सुमारास मेहुणाराजा या त्यांच्या मूळ गावी अनंतात विलीन झाले. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळ हजारो नागरिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सैन्य अधिकारी उपस्थित होते.
२६ जून रोजी दिले सर्वोच्च बलिदान
संत चोखामेळा महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहुणाराजा गावचे सुपुत्र अंकुश मिसाळ हे भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत होते. २६ जून २०२६ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करताना त्यांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह परिसरात शोककळा पसरली होती.
"अंकुश मिसाळ अमर रहें" च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
शहीद जवानाचे पार्थिव सोमवारी गावी दाखल होताच संपूर्ण परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आपल्या लाडक्या वीरपुत्राला अखेरचा सलाम केला. "भारत माता की जय", "वंदे मातरम्" आणि "शहीद अंकुश मिसाळ अमर रहें" अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर देशासाठी बलिदान दिलेल्या या जवानाबद्दल प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना होती.
सैन्य दलाकडून शस्त्र सलामी
अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सैन्य दलाच्या जवानांनी शस्त्र सलामी देत शहीद जवानाला मानवंदना अर्पण केली. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी उपस्थित नागरिकांनी, "जोपर्यंत सूर्य-चंद्र राहतील, तोपर्यंत अंकुश मिसाळ यांचे नाव राहील" अशा भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर, देश रक्षणाची गाथा ठरेल प्रेरणादायी
शहीद अंकुश मिसाळ यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा रणवीर आणि मुलगी दिव्या असा परिवार आहे. त्यांचे वडील पूर्वीच निवर्तले असून त्यांना दोन बहिणी आहेत. कुटुंबाचा मुख्य आधारवड हरपल्याने मिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र देशासाठी प्राणावर उदार होणाऱ्या आपल्या पुत्राचा अभिमानही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. देशाच्या संरक्षणासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणारे अंकुश महादेव मिसाळ हे बुलढाणा जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेतील आणखी एक तेजस्वी अध्याय ठरले आहेत. त्यांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची गाथा भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
शहीद हवालदार अंकुश महादेव मिसाळ अमर रहें!
भावपूर्ण श्रद्धांजली!

0 Comments