केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'जलजीवन मिशन' अंतर्गत देऊळगाव मही शहरासाठी सुमारे ५ कोटी रुपयांची नळ योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय अनास्था आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे तब्बल पाच वर्षे उलटूनही हे काम रखडलेलेच आहे. परिणामी, संपूर्ण शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आज ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले स्टाईल' एल्गार पुकारला.
आज, २९ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊत आणि अनंता इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कारभारी देढे, सागर रोतळे व हरि शिंदे यांनी फिल्टर प्लांटवरील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलनस्थळी पोलिसांनी तातडीने चोख बंदोबस्त तैनात केला होता.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या महिला कनिष्ठ अभियंता श्रद्धा बनकर, कनिष्ठ अभियंता आकाश कचरे आणि भूषणकुमार आडे यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून एक लेखी आश्वासन पत्र दिले.
या पत्रात नमूद केल्यानुसार:
१. देऊळगाव मही शहरातील अपूर्ण राहिलेले अंदाजे ५.५ किमी पाईपलाईनचे काम आणि इतर त्रुटी २ जुलैपासून युद्धपातळीवर सुरू करण्यात येतील.
२. फिल्टर प्लांटच्या टाकीपासून गावाच्या वेशीपर्यंत 'रायझिंग मेन' (१४० मिमी) पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण केले जाईल.
३. पाणीपुरवठा वितरण व्यवस्था पूर्णपणे सुधारून ती सुरळीत केली जाईल.
या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी सरपंच वसुदेव पाटील, ग्रामविकास अधिकारी वसंतराव चेके, शेख जुल्फिकार, माजी सरपंच रामा म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र संघर्ष करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

0 Comments