हनी ट्रॅप प्रकरणात मोठा खुलासा: मुख्य आरोपी महिला सिंदखेड राजा तालुक्याची रहिवासी; सोशल मीडियातून रचले होते जाळे!


सिंदखेड राजा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
जिल्ह्यात खळबळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित हनी ट्रॅप आणि खंडणी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे. या संपूर्ण गुन्ह्याची मुख्य सूत्रधार बुलढाणा जिल्ह्यातील २३ वर्षीय महिला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 


चंदनझिरा पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह तिच्या टोळीतील इतर ५ पुरुष साथीदारांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोशल मीडियावरून टाकायची जाळे; अशी होती मोडस ऑपरेंडी

प्राथमिक तपासानुसार, ही टोळी सोशल मीडियाच्या (फेसबुक, इंस्टाग्राम) माध्यमातून सधन किंवा लक्ष्य केलेल्या व्यक्तींशी मैत्री वाढवायची. मैत्रीचे रूपांतर हळूहळू जवळीकीत करून संबंधित व्यक्तीला जाळ्यात ओढले जायचे. त्यानंतर त्याचे अश्लील व्हिडिओ किंवा फोटो तयार करून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी उकळली जायची.

बोलेरो चालकाला लुटले, २३ जून रोजी गुन्हा दाखल

या टोळीने २० जून रोजी एका बोलेरो चालकाला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याला निर्जन स्थळी बोलावून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. हे व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी त्याच्याकडे सुमारे २ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. या त्रासाला कंटाळून पीडित चालकाने २३ जून रोजी जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली.

पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून अटक

मुख्य आरोपी महिला गुन्हा दाखल झाल्याचे समजताच बुलढाणा जिल्ह्यात पळून जाण्याच्या तयारीत होती. मात्र, चंदनझिरा पोलिसांना याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी देऊळगाव राजा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला आणि मुख्य आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तिच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे टोळीतील इतर ५ सदस्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. मुख्य आरोपी महिला (वय २३ वर्ष, रा. सिंदखेड राजा)
२. अविनाश गणेश झोटे
३. अर्जुन चमन बहादूर राजपूत
४. शंकर माणिक जाधव
५. अतिश सतीश गायकवाड
६. सचिन लक्ष्मण कंठाळे

पोलीस कारवाईदरम्यान गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि सुमारे २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी महिलेचा गुन्हेगारी इतिहास

तपासात समोर आले आहे की, मुख्य आरोपी महिला मूळची सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ (माहेर) येथील असून तिचे सासर पांगरी उगले येथे आहे. तिला एक मुलगी असून गेल्या ६ वर्षांपासून ती माहेरी किंवा सासरी न राहता स्वतंत्र राहत होती. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर परिसरातील एका आत्महत्येच्या प्रकरणात 'आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या' आरोपाखाली तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि तिला अटकही झाली होती. कारागृहातून सुटल्यानंतर तिने पुन्हा हे हनी ट्रॅपचे रॅकेट सुरू केले.

पोलीस आवाहन आणि खबरदारी

ऑनलाइन ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तींवर सहजासहजी विश्वास ठेवू नका. आपले वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा संवेदनशील माहिती शेअर करण्यापूर्वी काळजी घ्या. सायबर गुन्हेगार किंवा अशा टोळ्यांचा संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments