खाकी आणि पांढऱ्या कोटाची संयुक्त धडक कारवाई; मेहकरमध्ये 'त्या' पांढऱ्या गाडीतील काळे कारनामे उघड!


मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे काळे कारनामे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. २७ जून रोजी आरोग्य विभागाच्या पी.सी.एन.डी.टी. (PCPNDT) पथकाने मेहकर पोलिसांच्या मदतीने एका गुप्त मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत, परतापूर गावात एका बोगस डॉक्टरला गर्भलिंग निदान करताना रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


गुप्त माहितीवरून पोलीस व वैद्यकीय पथकाचा छापा

​मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि मेहकर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे मॅडम यांना एका गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली होती की, 'वेदीका लॉन्स' समोर एका पांढऱ्या रंगाच्या 'एक्सप्रो' चारचाकी वाहनातून (क्र. MH 38 V 7928) काही इसम महिलांची बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करत आहेत आणि स्वतः डॉक्टर असल्याचे खोटे सांगून लोकांची फसवणूक करत आहेत.
​या माहितीच्या आधारे वैद्यकीय पथक आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ते वाहन तिथून निघून परतापूर या गावी गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ परतापूर गाठले.

​घरावर छापा आणि मुद्देमाल जप्त

​परतापूर गावात सदर संशयास्पद वाहन अमोल रमेश रसाळ या इसमाच्या घरासमोर उभे असलेले आढळले. पोलिसांनी आणि वैद्यकीय पथकाने पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता, त्या ठिकाणी दवाखान्यासारखे स्वरूप तयार करून एका महिलेची गर्भलिंग निदान चाचणी सुरू असल्याचे रंगेहात आढळून आले.
​कारवाई दरम्यान खालील साहित्य जप्त करण्यात आले:
​१ अवैध सोनोग्राफी मशीन (काळ्या रंगाच्या बॅगेत)
​वैद्यकीय कामात जनरल प्रॅक्टिससाठी लागणाऱ्या गोळ्या आणि इंजेक्शन्स
​३ स्टेथॉस्कोप (Stethoscope)
​१ थर्मामीटर (Thermometer)
​जनरल प्रॅक्टिसकरिता लागणारी इतर वैद्यकीय औषधे व साहित्य.
​दोन आरोपींना अटक
​या प्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे:
१) अमोल रमेश रसाळ (वय ३३ वर्षे, रा. परतापूर, ता. मेहकर)
२) अनिल रामदास सोनुने (वय ३९ वर्षे, रा. कहाकर बु., ता. सेनगाव, जि. हिंगोली)
​गुन्हा दाखल

​वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात अप. नं. ४३५/२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७७, ३१९(२) सहकलम ३३, ३३(२)(अ) महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगिरी करणारे पथक

​सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष खाडे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​या यशस्वी मोहिमेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे, शंकर वायाळ (वरिष्ठ लिपीक), प्रशांत थोरे (पु. अधीक्षिका), श्रीमती मंगला वायाळ (इन्चार्ज), चालक दत्ता शिंदे, तसेच पोलीस स्टाफमध्ये पो.नि. व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि. संदीप बिराजे, सपोनि. प्रदिपकुमार राठोड, पोहेकॉ. लक्ष्मण कटक, पोहेकॉ. प्रभाकर शिवणकर, पोकॉ. मोहम्मद परसुवाले, पोकॉ. केशव अवचार, मपोकॉ. आम्रपाली सरकटे, चालक पोहेकॉ. संदीप भोंडाणे आणि पोकॉ. संजय काकडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
​पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments