सुलतानपूर येथे 'श्री जगन्नाथ शिंदे फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना' नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न; फार्मासिस्टांना मिळणार अपघात विमा संरक्षण!

सुलतानपूर जि. बुलडाणा (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'मा. श्री. जगन्नाथ (आप्पासाहेब) सखाराम शिंदे फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजने' च्या नावनोंदणीसाठी सुलतानपूर येथे विशेष मार्गदर्शन व नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन मा श्री अनिल भाऊ नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील फार्मासिस्टांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक मा. श्री. गजाननजी उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुलतानपूर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. भागवतजी पडघान, उपाध्यक्ष मा. श्री. मोईन खान यांच्यासह सुलतानपूर केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वचनपूर्तीचा आनंद: फार्मासिस्टांना मिळणार हक्काचे विमा संरक्षण

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या निवडणुकीत MSCDA पॅनलने आपल्या जाहीरनाम्यात नोंदणीकृत फार्मासिस्टांसाठी अपघात विमा संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण झाले असून, ही योजना म्हणजेच त्या वचनपूर्तीचे जिवंत प्रतीक आहे, अशा भावना याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

लाखो कुटुंबांना मिळणार आर्थिक आधार: गणेशजी बंगळे

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे सदस्य मा. श्री. गणेशजी बंगळे यांनी या प्रसंगी उपस्थित फार्मासिस्टांना योजनेचे महत्त्व, उद्दिष्टे व मिळणारे लाभ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. "या सुरक्षा कवच योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो फार्मासिस्ट आणि त्यांच्या कुटुंबांना एक भक्कम आर्थिक संरक्षण आणि सुरक्षिततेचा आधार मिळणार आहे," असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.

ऑनलाईन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

या शिबिरादरम्यान अनेक फार्मासिस्टांची ऑनलाईन नावनोंदणी प्रत्यक्ष जागेवरच पूर्ण करण्यात आली. फार्मासिस्टांच्या हितासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे सर्वांनी मनापासून स्वागत केले.

 "फार्मासिस्टांचे संरक्षण – कुटुंबाची सुरक्षितता" या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, महाराष्ट्रातील प्रत्येक नोंदणीकृत फार्मासिस्टपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन शेवटी करण्यात आले.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments