"आपल्या शहराला आपली गरज आहे" हाच मूलमंत्र डोळ्यांसमोर ठेवून ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आणि 'मी लोणारकर टीम'च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली. ‘क्लीन लोणार, ग्रीन लोणार’ आणि ‘एक घर एक झाड’ या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हाधिकार्यांच्या हस्ते मोहिमेचा शानदार शुभारंभ
या विशेष मोहिमेचा अधिकृत शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (मंठा नाका, लोणार) येथून बुलढाणा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धारातीर्थ पर्यंतच्या संपूर्ण परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. शहरात यापुढेही नियमित स्वरूपात वृक्ष लागवड, संवर्धन आणि स्वच्छता राखण्याचा निर्धार याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी केला.
पर्यटक सुविधा केंद्रात समारोपीय सोहळा व शपथविधी
स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेनंतर सकाळी १०:०० वाजता पर्यटक सुविधा केंद्र (जुनी तहसील इमारत) येथे या मोहिमेचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'मी लोणारकर टीम'चे संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर प्राध्यापक गजानन खरात यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.
यावेळी मानद वन्यजीव रक्षक सचिन कापुरे यांनी उपस्थित सर्व नागरिकांना 'माझी वसुंधरा अभियाना' ची शपथ दिली, तसेच पंचमहाभूतांच्या रक्षणाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. माननीय जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांनी आपल्या मोलाच्या मार्गदर्शनातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या हस्ते मोहिमेत सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र वितरण करून कार्यक्रमाचा यशस्वी समारोप करण्यात आला.
सर्व संस्था व नागरिकांचा सामूहिक पुढाकार
या स्तुत्य आणि यशस्वी उपक्रमाचे आयोजन मी लोणारकर टीम, शिवछत्र मित्र मंडळ, निसर्ग मल्टीपर्पज संस्था, लोणार पत्रकार संघ, विदर्भ अकॅडमी, सर्व शासकीय कार्यालये आणि समस्त लोणारकर नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी मा. प्रकाशभाऊ मापारी, नंदूभाऊ मापारी, बळीभाऊ मापारी, पांडूरंग जी सरकटे, मा. यशवंत नागूलवार (विभागीय वनाधिकारी), मा. रविंद्र जोगी (उपविभागीय अधिकारी, मेहकर), मा. प्रशांत सानप (उपविभागीय अधिकारी, लोणार), मा. भूषण पाटील (तहसिलदार, लोणार), मा. विभा वराडे (मुख्याधिकारी, न. प. लोणार), रविराज सिदोरे (तालुका कृषी अधिकारी, लोणार) यांच्यासह पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने लोणारचे नागरिक उपस्थित होते. संपूर्ण शहरातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.

0 Comments