तालुक्यातील वाकद येथे शेतकरी संतोष खनपटे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत संसारोपयोगी साहित्य, शेतीसाठी साठवून ठेवलेले बियाणे, खते तसेच इतर मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अचानक घरातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील साहित्य बाहेर काढण्यास कुटुंबीयांना वेळ मिळाला नाही. आगीमुळे घरातील भांडी, कपडे, धान्य, शेतीसाठी साठवलेले बियाणे, खते आणि अन्य महत्त्वाचे साहित्य जळून नष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे आग पुढे पसरण्यापासून रोखण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाच्या अनेक वर्षांच्या कष्टाने उभारलेल्या संसाराचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. तसेच बाधित कुटुंबाला धीर देत शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पंचनामा करून नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यात यावे व शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सध्या खनपटे कुटुंब मोठ्या संकटात सापडले असून सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आणि प्रशासनाने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
"आगीत संसार जळाला, पण ग्रामस्थांच्या आधारामुळे धीर मिळाला," अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

0 Comments