प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान नांदेड तर्फे 2024,25 ह्या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉ अच्युत बन, वाड्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ सुरेश सावंत आणि संयोजक पत्रकार संजीव कुळकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रख्यात मराठी कवी,नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या अथर्व पब्लिकेशन जळगावने प्रसिद्ध केलेल्या ,,वळीवाच्या वेळा,, या बहुचर्चित कवितासंग्रहास प्रसाद बन सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.11000 अकरा हजार हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
12 जुलै 2026 रोजी नांदेड शहरात एका विशेष समारंभात उपरोक्त पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान नांदेड तर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे मानकरी ज्येष्ठ संपादक,प्रसिद्ध लेखक गिरीष कुबेर, संगीता अरबुने आणि डॉ प्र दि जोशी पाटोदेकर ही दिग्गज मंडळी ठरली आहे.प्रतिष्ठानाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे हे विशेष.
प्रसाद बन उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्काराचे मानकरी ठरलेले प्रख्यात मराठी कवी आणि श्रोताप्रिय वक्ते, निवेदक अजीम नवाज राही महाराष्ट्र राज्याच्या लेखणी आणि वाणी या दोन क्षेत्रातील महत्वाचं आणि वलयांकित नाव आहे.
व्यवहाराचा काळा घोडा,कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ आणि अथर्व पब्लिकेशन जळगाव तर्फे प्रसिद्ध झालेला पुरस्कारप्राप्त ,, वळीवाच्या वेळा,, या पाच सकस कवितासंग्रहांचे ते धनी आहेत.
अजीम नवाज राही हे नाव नवनिर्मितेचे प्रयोगाशीलतेचे बलस्थान असून कुठल्याही मळक्या वाटेने न जाता स्वतःची नाममुद्रा त्यांनी वर्तमान मराठी कवितेच्या पानावर ठसठशीतपणे उमटवली आहे.अजीम नवाज राही यांच्या कवितेने परिघावरचे विश्व मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या कवितेतील व्यक्त होणारे दुःख सर्वसामान्यांच्या,शेतकरी,
शेतमजुर, कामगारांच्या,शोषितांच्या किंबहुना अस्तित्वहीन माणसाच्या जगण्यातले आहे.
प्रतितिष्ठासंपन्न कितीतरी श्रेष्ठ पुरस्कारांचा त्यांच्या कवितासंग्रहांवर वर्षाव झाला आहे.
प्रसाद बन सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार प्राप्त,,वळीवाच्या वेळा ,, कवितासंग्रह समकालीन समाजमनाचं लख्ख प्रतिबिंब आहे. विद्यमान आव्हानांशी थेट भिडताना ,,वळीवाच्या वेळा,, मधली कविता आक्रस्ताळी वा कंठाळी होत नाही. धर्म,जात,पंथाच्या तटबंदीत न अडकता सर्वधर्मीय माणसांची निखळ काळजी वाहते.वास्तवाचा,सकसतेचा, प्रयोगशीलतेचा ध्यास असलेली ही कविता भाषिकअंगाने, अनुभवाच्या अंगाने अगदी समृद्ध आहे.समग्र चिंतीत वर्तमान कवेत घेणारी आहे.
त्यांच्या कवितेतली गर्दगहिरी वस्तुनिष्ठता, घनगर्द सच्चाई, प्रतिमाशृंखलांचे अनोखे लावण्य, मातीचा सुवास लेवून आलेली भरजरी,चवदार भाषा.स्वतःची घडवलेली खास मृदगंधी शब्दकळा, ही मोठी दौलत घेऊन जगणारे,लिहिणारे
अजीम नवाज राही वर्तमान पिढीतील महत्वाचे कवी आहेत. कवितागणिक,
कवितासंग्रहागणिक त्यांच्या कवितेचे निराळेपण अधोरेखित झाले आहे. रेखांकित झाले आहे. मुस्लिम संस्कृती आणि या संस्कृतीबाहेरचा सर्वधर्मीय भोवताल, जीवनरितींचे बहुपदर घेऊन उभी राहिलेली त्यांची कविता मूळात मानव्याचे सुक्त गाणारी आहे.
अजीम नवाज राही यांना आजतागायत अमेरिकेतील फाउंडेशन,भारतातील केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबईचा साहित्य प्रांतातील अत्यंत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय लेखनाचा कवी केशवसुत पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तीबोध,अमरावती आणि नाशिकचा नारायण सुर्वे पुरस्कार ,आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा इंदिरा संत पुरस्कार,शरद पवार ग्रंथ पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, लोकमत समूहाचा लोकमत साहित्य पुरस्कार, भि ग रोहमारे पुरस्कार, शिवसेना नवरत्न पुरस्कार, शिंगणे परिवाराचा सहकारमहर्षी स्व भास्करराव शिंगणे पुरस्कार,कन्नडचा स्वातंत्र्यसेनानी,दलितमित्र भाऊसाहेब मोरे पुरस्कार,
ना घ देशपांडे पुरस्कार, मराठा सेवा संघ जिजाऊ साहित्यरत्न पुरस्कार, शिक्षण महर्षी तात्याराव मोरे पुरस्कार उमरगा,कविवर्य देवानंद गोरडे पुरस्कार,मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचा कुसुमताई देशमुख पुरस्कार,साहित्य परिषद पुणेचा भा रा तांबे पुरस्कार, लोकनेते राजारामबापू पाटील पुरस्कार इस्लामपूर,दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा धम्मपाल रत्नाकर उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार इत्यादी मातब्बर पुरस्कार मिळाले आहेत.
इयत्ता 10 वी ,इयत्ता 11वी व महाराष्ट्राच्या 11 विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश असून अजीम नावज राही राज्यभर भ्रमंती करणारे श्रोताप्रिय वक्ते आणि निवेदक आहेत.

0 Comments