BIG BREAKING: गावकरी टाइम्सच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट! जानेफळ स्वीट मार्टवर FDA ची धडक कारवाई; व्यवसाय बंदची नोटीस, गुन्हा दाखल

मेहकर/जानेफळ (गावकरी टाइम्स प्रतिनिधी):
जानेफळ येथील श्री अन्न स्वीट मार्टमध्ये समोसे आणि कचोरीसाठी लागणारे पीठ पायाने तुडवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण मेहकर तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाला गावकरी टाइम्सने ठळकपणे वाचा फोडल्यानंतर अखेर प्रशासनाने कठोर पावले उचलत संबंधित आस्थापनाविरोधात मोठी कारवाई केली आहे.
विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लाल रंगाच्या टबमध्ये उभा राहून पायाने पीठ तुडवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली होती.


तपासणीत मोठी कारवाई
दि. १८ जून २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जानेफळ येथील श्री अन्न स्वीट मार्ट, अकोला रोड, जानेफळ येथे अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नमुने घेण्यात आले. संबंधित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
तपासणीदरम्यान आस्थापनामध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्राथमिक स्तरावर निदर्शनास आल्याने संबंधित व्यावसायिकास व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जानेफळ पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे.
१० ते १५ वर्षांचा विश्वास धुळीस?
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, श्री अन्न स्वीट मार्ट हे दुकान गेल्या १० ते १५ वर्षांपासून परिसरात कार्यरत आहे. समोसे, कचोरी, लाडू, पेढे आणि इतर खाद्यपदार्थांसाठी या दुकानावर अनेक ग्राहकांचा विश्वास होता. मात्र व्हायरल व्हिडिओमुळे हा विश्वास डळमळीत झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गावकरी टाइम्सच्या वृत्ताचा परिणाम
जानेफळ येथील हा धक्कादायक प्रकार गावकरी टाइम्सने सर्वप्रथम ठळकपणे मांडला होता. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आणि प्रशासनालाही तातडीने दखल घ्यावी लागली. अखेर FDA आणि पोलिसांच्या कारवाईमुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे.
नागरिकांना आवाहन
आपण ज्या ठिकाणाहून खाद्यपदार्थ खरेदी करतो, त्या ठिकाणची स्वच्छता, गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही याची खात्री करा. कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ संबंधित प्रशासनाला माहिती द्या.

– गावकरी टाइम्स
"सत्याचा आवाज... गावकऱ्यांचा विश्वास"
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments