रस्त्याच्या मागणीसाठी राजनी येथील ग्रामस्थांचे आजपासून आमरण उपोषण; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

लोणार (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
शासनाकडून मिळालेल्या प्लॉटधारकांना जाण्या-येण्यासाठी रस्ता शिल्लक न राहिल्याने आणि प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही दखल घेतली जात नसल्याने, शेवटी संतप्त झालेल्या मौजे राजनी (ता. लोणार, जि. बुलढाणा) येथील नागरिकांनी आज, दि. २२ जून २०२६ पासून गट ग्रामपंचायत धानोरा/राजनी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे राजनी येथील रहिवाशांना शासनाकडून ले-आउट मार्फत अधिकृत प्लॉट मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार हे सर्व नागरिक दरवर्षी राजनी/धानोरा गट ग्रामपंचायतीकडे रीतसर घरपट्टी देखील भरत आहेत. परंतु, या भागात नव्याने झालेल्या कॅनॉलमुळे (कालवा) येथील रहिवाशांचा मुख्य रस्ताच बंद झाला आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट होते आणि संपूर्ण संपर्क तुटतो.


वारंवार विनंती करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष: या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि इतर संबंधित विभागांकडे अनेकदा लेखी विनंती अर्ज सादर केले. परंतु, प्रशासकीय पातळीवर यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या या उदासीन भूमिकेमुळे संतप्त होऊन नागरिकांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

जीवाचे बरे-वाईट झाल्यास शासन जबाबदार: "आम्हाला कॅनॉलवरून सरळ व सुरक्षित रस्ता मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून वृद्ध, महिला आणि बालकांच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही. जोपर्यंत आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील," असा पवित्रा उपोषणकर्ते रमेश पुंजाजी डोंगरे व इतर ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच, या उपोषणादरम्यान जर कोणाच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची असेल, असा इशाराही आंदोलकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments