समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज पुन्हा एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २३ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडोअरवर चॅनल क्रमांक ३२६.५ जवळ एका भरधाव फॉर्च्यूनर कारने समोरील ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले नामांकित डॉक्टर पती-पत्नी जागीच ठार झाले, तर त्यांची मुलगी, मुलगा आणि कारचालक गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील मृत व जखमींची नावे:
मृत: डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर (वय ५२ वर्ष)
मृत: गुलसितानबी सय्यद आसिफ (वय ४५ वर्ष)
गंभीर जखमी: नबा सय्यद आसिफ (मुलगी, वय १८ वर्ष), सय्यद अजब माज सय्यद आसिफ (मुलगा, वय २५ वर्ष) आणि चालक शेख साजिद शेख फरीद.
धावत्या ट्रकला कारची पाठीमागून भीषण धडक
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील ट्रक चालक मोहम्मद इजराउल हक हा आपला ट्रक (क्रमांक NL 01 AD 4981) घेऊन नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान, याच मार्गावरून छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर सय्यद आसिफ हे आपल्या कुटुंबासह फॉर्च्यूनर कारने (क्रमांक MH 20 HN 6768) प्रवास करत होते. मुंबई कॉरिडोअरवरील मध्यम लेनवर धावणाऱ्या या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या फॉर्च्यूनर कारने अत्यंत भीषण धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
घटनास्थळी पोलिसांची धाव, जखमींना जालन्याला हलवले
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सोळंके, आरख, राठोड, चौधरी, शेख नासिर आणि बारगजे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना आणि मृतांना बाहेर काढले. दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेने सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
तसेच गंभीर जखमी असलेल्या दोन्ही मुलांवर आणि चालकावर प्रथमोपचार करून, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला सारून दुसरबीड टोल नाका येथे लावण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 Comments