दाभा ता. लोणार(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):गरीब कुटुंबात जन्म, घरची हलाखीची परिस्थिती, रोजंदारी मजुरी करणारे आई-वडील... पण डोळ्यांत मात्र देशाच्या रक्षणाचे अथांग स्वप्न! या सर्व परिस्थितीवर मात करत लोणार तालुक्यातील दाभा गावातील श्रावण अशोक बोखारे यांनी भारतीय सैन्यात (Indian Army) निवड मिळवून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत दाभा गावातून पोलीस, आर्मी किंवा सैन्यदलात एकही मुलगा भरती झाला नव्हता. गावातील पहिलीच सैन्य भरती ठरण्याचा ऐतिहासिक बहुमान श्रावण यांनी पटकावला असून, त्यांच्या या यशाने संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
श्रावण यांचे वडील अशोक बोखारे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई रेखा बोखारे यांनीही अनेक संकटांचा सामना करत मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. आर्थिक अडचणींमुळे अनेक वेळा स्वप्नांवर मर्यादा येतात; मात्र श्रावण यांनी परिस्थितीला शरण न जाता, तिलाच आपल्या यशाची ढाल बनवले.
दिवसा मजुरी, पहाटे सैन्य भरतीची तयारी!
शिक्षणासोबतच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी श्रावण स्वतः मजुरी करत होते. दिवसाचे अंगमेहनतीचे कष्ट आणि पहाटेची सैन्य भरतीची कठोर पूर्वतयारी असा त्यांचा खडतर दिनक्रम होता. उन्हाळा, पावसाळा की थंडी यांची कोणतीही पर्वा न करता, त्यांनी नियमित धावणे, मैदानी व्यायाम आणि रात्रीचा अभ्यास सुरू ठेवला. अनेकदा अपयश आले, पाय खेचणारे प्रसंग आले, पण त्यांनी हार मानली नाही.
गावात जल्लोष; मिळाला 'पहिला फौजी'
अखेर त्यांच्या या अथांग मेहनतीचे चीज झाले आणि भारतीय सैन्याच्या अत्यंत कठीण अशा निवड प्रक्रियेत त्यांनी यश मिळवले. दाभा गावातून थेट भारतीय सैन्यात जाणारा 'श्रावण' हा पहिलाच तरुण ठरल्याची बातमी गावात पोहोचताच ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गावात एकच जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. अनेकांनी श्रावणच्या घरी जाऊन आई-वडिलांचा सत्कार केला व श्रावणला गावाचा खरा 'रिअल हिरो' संबोधले.
तरुणांसाठी ठरले आदर्श!
आजच्या डिजिटल युगात, जिथे तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मोहात अडकत चालली आहे, तिथे साधनांची कमतरता असतानाही केवळ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीच्या जोरावर देशाचे सर्वोच्च ध्येय गाठता येते, हे श्रावणने सिद्ध केले आहे.
श्रावण बोखारे यांची भारतीय सैन्यात झालेली ही निवड केवळ एका कुटुंबाचे यश नाही, तर संपूर्ण दाभा गावासाठी एका नव्या युगाची सुरुवात आहे. त्यांच्या या यशाची प्रेरणा घेऊन गावातील आणि परिसरातील अनेक तरुण आता देशसेवेच्या मार्गावर पाऊल ठेवतील, यात शंका नाही!

0 Comments