गुटखा विक्रेत्यांवर आता 'मकोका' लागणार; आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी काय दिला इशारा वाचा सविस्तर बातमी...

बुलडाणा (गावकरी टाइम्स विशेष प्रतिनिधी):
राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच बेकायदा गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यभरात झालेल्या धडक कारवायानंतर आता आयुक्त मुंढे आणखी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, उत्पादकांपासून ते विक्री करणाऱ्यांपर्यंत सर्वांवर थेट 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.


बेकायदा नेटवर्क मोडून काढण्यासाठी 'मकोका'चे हत्यार

राज्यात गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या संघटित टोळ्या कार्यरत आहेत. या संघटित गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (मकोका) लागू करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामध्ये केवळ बेकायदा माल विकणारेच नाही, तर खरेदी करणारे देखील तितकेच जबाबदार असणार असून, संबंधित आरोपींचा गुन्हेगारी इतिहास पाहून ही कडक कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

२५ मे ते ११ जून दरम्यान ३ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा व प्रतिबंधित माल जप्त केला आहे. २५ मे ते ११ जून या अल्प कालावधीत प्रतिबंधक गुन्ह्यांमध्ये तब्बल ३ कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ३५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले असून ३५० जणांना अटक करण्यात आली आहे.

खात्यांतर्गत 'फितुरांवर'ही होणार कडक कारवाई

पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त मुंढे यांनी स्वतःच्याच विभागातील अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. "या अवैध धंद्यांमध्ये आमचे काही अधिकारी देखील इनव्हॉल्व्ड (सामील) आहेत, असे आरोप होत आहेत. आम्ही सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहोत. जर कोणी अधिकारी यामध्ये सहभागी असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असा सज्जड दम त्यांनी दिला.

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांना सक्त ताकीद

केवळ गुटखाच नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या इतर घटकांवरही एफडीएने लक्ष केंद्रित केले आहे. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशी सक्त ताकीद अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यविक्रेत्यांना देण्यात आली असून, असे करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments