लोणार तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईची धास्ती; सुलतानपूरसह अनेक गावांत हॉटेल, पानटपऱ्या आणि स्वीटमार्टचे शटर डाऊन!


लोणार (गावकरी टाइम्स)
:
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि नियमबाह्य व्यवसायांविरोधात कठोर मोहीम उघडली आहे. याच धर्तीवर लोणार तालुक्यात एफडीआय (FDA) पथक दाखल होऊन मोठी तपासणी मोहीम राबवणार असल्याची चर्चा कालपासून वाऱ्यासारखी पसरली. या कारवाईच्या केवळ चर्चेनेच लोणार तालुका आणि विशेषतः सुलतानपूर परिसरातील हॉटेल चालक, मिठाई दुकाने, पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांचे धाबे दणाणले असून, व्यवसायिकांनी दिवसभर आपली दुकाने बंद ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कारवाईची धास्ती की नियमांचे उल्लंघन?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपासूनच सुलतानपूर आणि लोणार परिसरातील मुख्य बाजारपेठेत एफडीआयचे पथक तपासणीसाठी येत असल्याची आवई उठली. ही बातमी पसरताच काही तासांतच बहुतांश खाद्य व्यवसायिकांनी ग्राहकांची पर्वा न करता आपापली दुकाने घाईघाईने बंद केली. नेहमी गजबजलेल्या सुलतानपूरच्या मुख्य चौकात आणि बाजारपेठेत यामुळे अचानक शुकशुकाट पसरला. दुकाने बंद झाल्यामुळे प्रवाशांना आणि नागरिकांना चहा, नाश्ता तसेच इतर खाद्यपदार्थांसाठी मोठी भटकंती करावी लागली.

केवळ चर्चेमुळे व्यापाऱ्यांची झोप उडाली

विशेष म्हणजे, एफडीआयचे पथक प्रत्यक्षात तालुक्यात आले की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून समोर आली नव्हती. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या 'धडक पॅटर्न'ची व्यापाऱ्यांनी एवढी धास्ती घेतली आहे की, केवळ एका चर्चेमुळे संपूर्ण तालुक्यात व्यापाऱ्यांची पळापळ झाली. "जर आपले सर्व व्यवहार नियमानुसार सुरू आहेत, तर तपासणीच्या केवळ चर्चेने एवढी भीती का?" असा सवाल आता सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. यावरून अन्न सुरक्षेच्या नियमांचे कितपत पालन केले जात होते, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

नागरिकांमधून नियमित तपासणीची मागणी

या औचक बंदमुळे नागरिकांचे हाल झाले असले, तरी परिसरातील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत जनतेने चिंता व्यक्त केली आहे. सुलतानपूर आणि लोणार तालुक्यातील सर्व हॉटेल, स्वीटमार्ट आणि अन्नपदार्थ विक्री केंद्रांची केवळ भीतीपोटी नव्हे, तर प्रशासनाने नियमितपणे कायदेशीर तपासणी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्वच्छता, अन्न सुरक्षा परवाना आणि कालबाह्य (Expired) वस्तूंची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments