तुकाराम मुंढेंचा केवळ ‘नाव’च काफी! साहेब येणार म्हणून मेहकरच्या बाजारातून बनावट पेढा अन् सुटे तेल गायब!

मेहकर (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
नवीन अधिकारी आला की खात्याला कशी नवी पालवी फुटते, याचा प्रत्यय सध्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात पाहायला मिळत आहे. 'नवा गडी, नवा राज' या म्हणीप्रमाणे धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी २५ मे २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कारभार हाती घेतला. त्यांच्या येण्याने सुस्तावलेला प्रशासन विभाग खाडकन जागा झाला असून, याचा थेट परिणाम आता ग्रामीण भागातील बाजारपेठांवर दिसू लागला आहे.


केवळ आयुक्तच नव्हे, तर या विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे पाय मेहकरमध्ये पडणार असल्याची माहिती मिळताच, अन्न व औषध प्रशासन विभागाने ६ जून रोजी संपूर्ण मेहकर परिसरात जोरदार झाडाझडती आणि विशेष पाहणी मोहीम राबवली. या धडक मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांची आणि नियम मोडणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.

 'साहेब' येणार म्हणून बाजारपेठ थेट 'अलर्ट मोड'वर!

तुकाराम मुंढे आणि मंत्री महोदयांच्या संभाव्य दौऱ्याचा धसका व्यापाऱ्यांनी एवढा घेतला आहे की, मेहकरसह संपूर्ण तालुक्याची बाजारपेठ एका रात्रीत सुतासारखी सरळ झाली आहे.
सुटे तेल आणि पेढे गायब: एरवी किराणा दुकानांमध्ये सर्रास मिळणारे 'खुले खाद्यतेल' आणि मिठाईच्या दुकानांमधील 'बनावट पेढे' बाजारातून एकाएकी गायब झाले आहेत. कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी माल गोदामात लपवून ठेवल्याची चर्चा आहे.

मेडिकलमध्ये 'अस्सल' मालकांचे दर्शन:

 ज्या मेडिकल स्टोअर्समध्ये अनेकदा मूळ परवानाधारक मालक नसून केवळ नोकर असायचे, तिथे आता मूळ मालक स्वतः गल्ल्यावर बसलेले दिसत आहेत. तसेच, दुकानातून एक्सपायरी डेट संपलेली औषधे तात्काळ हटवण्यात आली आहेत.

 'जानेफळ फाट्यावर' रद्दीच्या कागदाचा पंचनामा!

या मोहिमेदरम्यान ८ जून रोजी मेहकर येथील अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण व अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त गजानन घिरके आणि प्रमोद पाटील यांनी आपल्या फौजफाट्यासह हॉटेल आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली.
हॉटेलमध्ये अन्नपदार्थ देण्यासाठी रद्दी किंवा वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करू नये, असा स्पष्ट सरकारी नियम आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच तंबी दिली असतानाही, जानेफळ फाट्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये चक्क वृत्तपत्राच्या कागदात 'मिठाई' (खाद्यपदार्थ) बांधून दिली जात असल्याचे रंगेहाथ पकडले गेले. ५ ठिकाणी केलेल्या पाहणीत ही एक मोठी चूक सापडल्यामुळे, प्रशासनाने या रेस्टॉरंटवर तातडीने कारवाई प्रस्तावित केली आहे.

थोडक्यात काय तर...

तुकाराम मुंढेंच्या नावाचा 'हाऊ' आणि मंत्र्यांचा दौरा यामुळे मेहकरमधील हॉटेल, मेडिकल आणि किराणा व्यावसायिक सध्या चांगलेच धास्तावले आहेत. जे काम वर्षानुवर्षे नियम करून होत नव्हते, ते काम 'साहेबांच्या' एका नावाने करून दाखवले आहे!
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments