लोणार नगर परिषद हद्दीतील जन्म व मृत्यू नोंदणीशी संबंधित प्रकरणांमध्ये नागरिकांना प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अनेक अर्जदारांची कामे महिनोनमहिने प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप जमीयत उलेमा लोणारचे अध्यक्ष ॲड. मोहम्मद रिझवान जड़ा यांनी केला आहे. या गंभीर समस्येबाबत त्यांनी लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी तक्रार सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे, तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा आणि उपोषणाचा इशारा दिला आहे.
नागरिकांची मानसिक व आर्थिक लूट
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत ॲड. रिझवान जडा यांनी नमूद केले आहे की, 'जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९' आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार नागरिकांना वेळेत सेवा मिळणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात लोणार नगर परिषदेत या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे.
विशेषतः विलंबित नोंदणी (Delayed Registration) प्रकरणांमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक श्रम वाया जात आहेत..
विद्यार्थी व तरुणांना नाहक त्रास
अनेक विद्यार्थी, नोकरीसाठी अर्ज करणारे युवक आणि विविध शासकीय योजनांचे लाभार्थी जन्म प्रमाणपत्रातील त्रुटी सुधारणे, नाव दुरुस्ती करणे किंवा नवीन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नगर परिषदेत वारंवार पाठपुरावा करत आहेत. परंतु, संबंधित विभागाकडून त्यांना कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत या तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.
"नगर परिषद प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन प्रलंबित प्रकरणांचा नियमानुसार आणि जलद निपटारा करावा. तसेच नागरिकांना मानसिक त्रास देणाऱ्या संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि गरज पडल्यास उपोषणही केले जाईल."
— ॲड. मोहम्मद रिझवान जडा (अध्यक्ष, जमीयत उलेमा, लोणार)
या आंदोलनामुळे आता लोणार नगर परिषद प्रशासन काय पावले उचलणार आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

0 Comments