मेहकर(गावकरी टाइम्स/प्रतिनिधी): कर्तव्यावर असताना अचानक समोर आलेले संकट... जीवावर बेतलेला हल्ला... पण मागे न हटता दाखवलेले अदम्य धाडस! मेहकर पोलीस ठाण्याच्या शूर जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी अवघ्या २४ तासांत एका अट्टल आणि हिंस्त्र घरफोड्यांच्या टोळीचा थरारक पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून पळ काढणाऱ्या ३ अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करून मेहकर पोलिसांनी गुन्हेगारी जगताला एक कडक आणि स्पष्ट संदेश दिला आहे की—"गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी मेहकर पोलिसांच्या हातापासून सुटू शकत नाही!"
...आणि मध्यरात्री थरार घडला!
२२ मे रोजी पहाटेच्या सुमारास लक्ष्मीनारायण नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये घरफोडीच्या उद्देशाने ही टोळी शिरली होती. गस्तीवर असलेल्या सतर्क पोलीस अंमलदारांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी या टोळीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी करून पोबारा केला. गुन्हेगारांनी ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल (चांदीचे दागिने आणि मोटारसायकल) चोरून नेला होता.
सुरू झाली 'मिशन २४ तास' मोहीम!
आपल्या सहकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण मेहकर पोलीस दल खडबडून जागे झाले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी आरोपींचा माग काढण्यासाठी तातधीने ३ धडाकेबाज पथके रवाना केली.
सिंदखेडराजा ते बीबी... पोलिसांचा चक्रव्यूह!
सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अवचार यांनी सिंदखेडराजा येथून अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे देशपलसिंग अजयपालसिंग भादा (वय २० वर्ष) याला सर्वप्रथम ताब्यात घेतले. त्याची 'खाकी' स्टाईलने चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या साथीदारांची नावे ओकली.
यानंतर, उपविभागीय कार्यालयाचे हेड कॉन्स्टेबल दिगंबर चव्हाण यांना मिळालेल्या अचूक माहितीवरून, बीबी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने लपून बसलेल्या इतर दोन आरोपींना वेढले गेले. धर्मेंद्रसिंग कालूसिंग बावरी (वय २५ वर्ष) आणि अजितसिंग राजुसिंग टाक (वय २० वर्ष, दोन्ही रा. बीबी) यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चोराने चोरलेला संपूर्ण मुद्देमाल आणि मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
या 'सिटम'ने करून दाखवलं!
अवघ्या २४ तासांच्या आत या गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून मेहकर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महत्त्वाची भूमिका बजावणारे मेहकरचे 'रिअल हिरोज': > पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि संदीप बिरंगे, सपोनि अशोक अवचार, सपोनि चंद्रकांत पाटील, पोउपनि किरण खाडे, पोउपनि प्रताप बाजीड, पोउपनि परमेश्वर शिंदे, सपोनि राजेंद्र काळे, पोहेकॉ लक्ष्मण कटक, विजय बंडवल, गवई, चोका ठोंबरे, अवचार, शिवाजी चिम, मोहम्मद परसुवाले, नगरे, अरमाळ, लेकरुवाळे, करीम तसेच चव्हाण, सूर्यवंशी, वारे आणि जवंजाल या सर्व शिलेदारांनी या धडक कारवाईत मोलाची भूमिका बजावली.
मेहकर पोलिसांच्या या उत्कृष्ट, धाडसी आणि तत्पर कामगिरीला 'सॅल्यूट'...!

0 Comments