जन्मप्रमाणपत्रासाठी २० कागदपत्रांची सक्ती का? मयुर गोलेच्छा यांचा प्रशासनाला सवाल!

लोणार (गावकरी टाइम्स/प्रतिनिधी):
जन्मप्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेत शासनाने अलीकडेच लागू केलेल्या जाचक आणि नवीन नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधीच जन्मप्रमाणपत्र मिळण्यासाठी तीन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असताना, आता नव्या नियमांमुळे ही प्रक्रिया अधिक क्लिष्ट झाली असून प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या तातडीने कमी करून प्रक्रिया सुलभ करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक मयुर गोलेच्छा यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांच्याकडे केली आहे. लोणारचे तहसीलदार भूषण पाटील यांच्यामार्फत हे निवेदन सादर करण्यात आले.


निवेदनात नमूद केल्यानुसार, जन्मप्रमाणपत्र हे प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. शाळा प्रवेश, शासकीय योजना, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यांसह विविध कामांसाठी त्याची गरज भासते. मात्र, नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमांनुसार जन्मप्रमाणपत्र मिळवण्यासाठी तब्बल २० प्रकारची कागदपत्रे सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये लसीकरणाच्या नोंदी, आई-वडिलांचे जन्मप्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी पुरावे, विवाह प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड यांसह अनेक कागदपत्रांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे ही सर्व कागदपत्रे उपलब्ध नसतात. अनेक वेळा जुन्या नोंदी हरवलेल्या असतात, तर कधी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सर्वसामान्य, शेतकरी, मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे.

शासनाने नागरिकांना सुविधा देण्याऐवजी प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची केली असून, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय योजनांचे लाभ रखडण्याची भीती मयुर गोलेच्छा यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने जन्मप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक करावी, मोजक्याच कागदपत्रांच्या आधारे ठराविक मुदतीत प्रमाणपत्र द्यावे, तसेच ग्रामीण भागात विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या या अडचणींबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीने लक्ष वेधण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार भूषण पाटील यांनी निवेदन स्वीकारताना दिले.

पुराव्याअभावी जन्मप्रमाणपत्र मिळणे कठीण!

जन्म प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया प्रचंड किचकट झाल्याने आता नागरिकांना आवश्यक पुरावे गोळा करण्यातच वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागणार आहे. त्यातच, शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक पुराव्यांचे कागदपत्र सादर न केल्यास जन्मप्रमाणपत्र मिळणार नसल्याचे तहसीलदार भूषण पाटील यांनी स्पष्ट केल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

सर्व दाखले एकाच छताखाली मिळायला हवेत!

"जन्मप्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे काम सध्या वेगवेगळ्या विभागांकडे विभागलेले असल्याने नागरिक गोंधळून जातात. हे सर्व प्रमाणपत्र देण्याचे काम थेट नगरपालिका प्रशासनाकडे सोपविण्यात यावे आणि ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र मिळण्याची गतिमान सुविधा शासनाने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल."
- मयुर गोलेच्छा (शिवसेना नगरसेवक / गटनेता, नगरपरिषद लोणार)
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments