मेहकर शहरातील लक्ष्मीनारायण नगर भागात रात्रीच्या सुमारास एका सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेदरम्यान दरोडेखोरांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास लक्ष्मीनारायण नगर येथे काही सशस्त्र दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत होते. यावेळी परिसरातील जागरूक नागरिक जुगराज पठे यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत भ्रमणध्वनीवरून (मोबाईल) पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार बाचाबाची झाली, ज्याचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण गवई (वय ५५ वर्षे) यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते दुखापतग्रस्त झाले, तर दुसरे पोलीस कर्मचारी शिवाजी चिंब (वय ३२ वर्षे) यांच्या हाताला मार लागला आहे. दोन्ही जखमी पोलिसांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या गदारोळाचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी लक्ष्मीनारायण नगरमधील रहिवासी देशपांडे नामक व्यक्तीची दुचाकी चोरली आणि त्यावरून पसार होण्यात ते यशस्वी झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, अधिक पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. फरार दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सक्रिय झाली असून, पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी आणि शोधमोहीम राबवली जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


0 Comments