संग्रामपुरात महावितरणचा ‘चोर-पोलिस’ खेळ; शासकीय कार्यालयांचा बत्तीगुल, नागरिक अन् विद्यार्थी त्रस्त!

संग्रामपूर (गावकरी टाइम्स/पवन ठाकरे):
संग्रामपूर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या शहरात सध्या महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. शहरात विजेचा जणू 'चोर-पोलिस' खेळ सुरू असून, मुख्य शासकीय कार्यालय परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना ताटकळत राहावे लागत असून, महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

महत्त्वाची कार्यालये अंधारात, कामे रखडली

संग्रामपूर येथे तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, कृषी विभागासह विविध शासकीय विभागांची प्रमुख कार्यालये आहेत. संपूर्ण तालुक्याचा गाडा याच परिसरातून चालतो. मात्र, नेमका याच महत्त्वाच्या कार्यालय परिसरातील वीज पुरवठा दिवसातून अनेकदा खंडित होतो. ग्रामीण भागातून मैलोनमैल प्रवास करून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे तासनतास वाट पाहावी लागत आहे. अनेकांना तर काम न होताच रिकाम्या हाती परत जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये महावितरण विभागाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!

सध्या दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांची विविध शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी (ऍडमिशन) लागणारी कागदपत्रे काढण्याची लगबग सुरू आहे. दाखले, प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थी तहसील व सेतू केंद्रांवर गर्दी करत आहेत. मात्र, सतत खंडित होणाऱ्या विजेमुळे ऑनलाइन प्रणाली ठप्प होते आणि विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास कमालीचा उशीर होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

महसूल, न्याय आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अत्यंत संवेदनशील असलेल्या या शासकीय परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा महावितरणने तात्काळ सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी आता संग्रामपूर तालुक्यातील नागरिक आणि संतप्त विद्यार्थ्यांनी केली आहे. महावितरण यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments