संग्रामपूर (गावकरी टाइम्स/पवन ठाकरे):शिवाजी वरणकार' आता झाले 'मुरली वंदन प्रभू'; कंबोडिया, मलेशियानंतर आता अमेरिकेत करणार धर्मप्रसार.
आजच्या आधुनिक युगात जिथे प्रत्येक तरुण लाखो रुपयांचे पॅकेज आणि आलिशान आयुष्याचे स्वप्न पाहत असतो, तिथे संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथील एका तरुणाने मात्र वेगळाच आदर्श घालून दिला आहे. टूनकी येथील उच्चशिक्षित तरुण शिवाजी विजय वरणकार याने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून मिळणारी तब्बल दोन लाख रुपये प्रतिमहिना पगाराची नोकरी सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ म्हणजेच 'इस्कॉन' (ISKCON) परिवाराची रीतसर दीक्षा घेतली आहे.
दीक्षेनंतर इस्कॉन परिवाराकडून त्यांचे 'मुरली वंदन प्रभू' असे नवीन नामकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या आध्यात्मिक निर्णयाला वरणकार परिवाराने खंबीर पाठिंबा दिला असून, संपूर्ण कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
परदेशात धर्मध्वज फडकवला; आता अमेरिकेची तयारी
मुरली वंदन प्रभू यांनी परमपिता परमेश्वराविषयी जनजागृती आणि सनातन धर्माच्या प्रसारासाठी आपले जीवन वाहिspaceले आहे. त्यांनी आपल्या गुरूं सोबत कंबोडिया आणि मलेशिया या देशांचा प्रवास करून तिथे आध्यात्मिक कार्याचा पाया मजबूत केला. आगामी काळात ते धर्मजागरण आणि अध्यात्मिक कार्यासाठी अमेरिकेचा दौरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
"मुरली वंदन प्रभू यांच्या हातून संपूर्ण जगात धार्मिक व जनसेवेचे कार्य घडो. त्यांनी परमात्मा प्राप्तीसाठी स्वीकारलेल्या संन्यास जीवनात अखंडपणे मानवसेवा व धर्मकार्य करत राहावे, हीच आमची अपेक्षा आणि भावना आहे."
— विश्वासराव पाटील वरणकार (अध्यक्ष, शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था, संग्रामपूर)
परिसरातून कौतुकाचा वर्षाव
अत्यंत चांगल्या पगाराची आणि सुखासीन नोकरी सोडून अध्यात्म, जनसेवा आणि परमात्मा प्राप्तीचा कठीण मार्ग स्वीकारल्यामुळे संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण परिसरात शिवाजी वरणकार (मुरली वंदन प्रभू) यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. समाजामध्ये धर्म, संस्कार आणि खऱ्या मानवसेवेचा संदेश पोहोचविण्यासाठी त्यांनी संन्यास जीवन स्वीकारले आहे. त्यांचे हे सेवाकार्य जगभर विस्तारावे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील आध्यात्मिक आणि सामाजिक वाटचालीसाठी सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0 Comments